पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रभावित होतात हे तीव्रतेनं जाणवतं. म्हणून मी लिहितो. मग त्याची कथा होते व कादंबरी होते.
 एका उदाहरणानं हे स्पष्ट करेन. 'बांध' या कथेत दुष्काळामुळे घरच्यांची पोटं भरली जावीत म्हणून कधी उंबरठा न ओलांडलेली एक खानदानी मराठा स्त्री रोजगार हमीवर काम करू लागते व श्रमानं ती काळवंडते. तिची मांसल पुष्टता कमी होते, म्हणून नवऱ्याला सेक्स करताना मजा येत नाही. तो बाजार जवळ करतो. आणि ती अपमानित होते. पण त्यातूनच तिला आत्मप्रतिष्ठेचा मार्ग कामाच्या माध्यमातून गवसतो... अशा आशयाची ही माझी कथा आहे. तिथं दुष्काळानं माणसाचं जगणं कठीण होतं, यापेक्षा त्यामुळे एका स्त्रीच्या जीवनात काय बदल घडून येतो हे मी रेखाटलं आहे. इथंच माझा ललित लेखनाचा पिंड म्हणा, आत्मस्वर म्हणा, मुखर होतो- व्यक्त होतो. उरस्फोडी कष्टानं स्त्रीआरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. पण तिची आकर्षकता कमी होते व संसारात विसंवाद निर्माण होतात. पण यातूनच त्या स्त्रीचा एक स्त्री म्हणून विकास होतो. तिची आत्मप्रतिष्ठा व सन्मान तिला कामातून मिळतो व स्वत:कडे, नवऱ्याकडे एका नव्या जाणिवेनं ती पाहू लागते. आपण म्हणजे आपलं मांसल-सेक्सी नवऱ्याची वासना तृप्त करणारं केवळ शरीर नाही, तर आपण एक स्वतंत्र माणूस आहोत व आपल्यालाही नवऱ्याप्रमाणे आत्मप्रतिष्ठा आहे आणि ती जपायची असेल तर आपण आर्थिकदृष्ट्या व त्याद्वारे मनानंही आत्मनिर्भर-स्वावलंबी बनलं पाहिजे. ही जाणीव तिला होते व कथा पूर्ण होते. हे मी जरा सविस्तर सांगितलं. कारण दुष्काळाचं भेदक वर्णन मी एका संसारी पारंपरिक स्त्रीचं आत्मनिर्भर व कणखर स्त्रीमध्ये कसं रूपांतर होतं हे या द्वारे मांडलं आहे. हा माझा ललित लेखनाचा पिंड आहे. मला वाटलं, मी लेखनाकडे कसं पाहातो याचं पुरेसं समर्पक उत्तर दिलं आहे.

 जसं सामाजिक वास्तव मला लेखक म्हणून लिहिण्यासाठी ओढून घेतं; तसंच नातेसंबंध आणि अंतर्मनाचा संघर्ष पण मला आव्हान देतो. माझ्या 'अंतरीच्या गूढगर्भी' कथासंग्रहात बहुतेक सर्व कथा ही अंतर्मनाची चित्रे आहेत. माझा आगामी कथासंग्रह 'मृगतृष्णा' मधील सर्वच कथा रिलेशनशिपच्या- स्त्री-पुरुष संबंधाच्या आहेत. पुन्हा अनेक कथा, ज्या प्रसिद्ध झाल्या आहेत - मासिक व दिवाळी अंकांतून - पण अजून पुस्तकरूपाने आल्या नाहीत, त्या विविध विषयाच्या, व्यक्तिरेखेच्या आहेत. सलग तीन थीमबेस्ड - एकाच विषय सूत्राभोवती फिरणाऱ्या विषयाचा कथासंग्रह प्रकाशित झाले म्हणून मी केवळ समाजिक विषयांवरच लेखन करतो असं वाचकांना वाटू शकतं. पण 'अंतरीच्या गूढगर्भी' व 'नंबर वन'मधील

अन्वयार्थ □ ३०७