पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भूगोल व तेथील माणसांची मानसिकता, जगण्यातून बनलेला त्यांचा स्वभाव... साठ वर्षात घडलेल्या घटना व संघर्ष... हे सारं आधी मला समजून घ्यावं लागलं. त्यासाठी प्रचंड अभ्यास मी केला... अर्थात, मला आधी विषय सुचत होता. एक दीर्घकथा व सव्वाशे पानाची छोटी कादंबरी आधी मी लिहिली. पण मला जे मांडायचं होतं ते फार व्यापक, विस्तृत पटलावरचं होतं म्हणून ती रद्द करून आज जी कादंबरी वाचकापुढे आहे ती लिहायचा घाट घातला. वीस भागांची ही कादंबरी. प्रत्येक भाग लिहिल्यावर पुढला भाग लिहिण्यापूर्वी वाचन-अभ्यास करणं अपरिहार्य होतं. पुन्हा हा अभ्यास कथानकात दुधात साखर विरघळावी तसा विरघळून सहज कलात्मकतेनं व ललित अंगानं आला पाहिजे हे कादंबरीकार म्हणून माझं कौशल्य असणार होतं. त्यासाठी प्रतिभा (असलेली) पणाला लागत होती. पण लिहिताना समाधान वाटत होतं व जाणवत होतं की आपण कदाचित आपल्या लेखकीय जीवनातलं एक मॅग्नम ओपस लिहीत आहोत... नुकतीच प्रकाशित झालेल्या माझी कादंबरी 'हरवलेले बालपण'चा विषय बालमजुरीच्या प्रश्नाशी संबंधित आहे. मी प्रशासनात याबाबत प्रत्यक्ष काम केलं व अनुभव घेतला. मग लघुप्रबंध लिहिण्याच्या निमित्ताने विडी उद्योगातील मुलींचे प्रश्न यावर संशोधन-अभ्यास केला. तसंच या प्रश्नाचे कायदेशीर पैलू व प्रशासकीय प्रश्न जाणून घेतले. एवढी प्रदीर्घ तयारी झाल्यावर प्रत्यक्ष लेखन झालं. पहिल्या खात माहिती, चर्चा व चिंतन जास्त होतं. म्हणून तो बाद केला. नव्यानं पुनर्लेखन केलं. मग माझं समाधान झाल्यावर ती प्रकाशित केली.

  ते सारं सांगताना स्वत:च्या काही लेखनाविषयी व प्रक्रियेविषयी मी थोडं दीर्घ बोललो, पण एकप्रकारे ते माझं मुक्त चिंतन होतं. त्यातून तुम्हाला आणि पुस्तकात आल्यावर वाचकांना वाचताना माझ्या लेखनाकडे पहाण्याचा दृष्टिकोनाविषयी पुरेसं आकलन झालं असेल असं वाटतं. सारांशरूपानं सांगायचं म्हणाल तर माझा लेखनाचा दृष्टिकोन हा सामाजिक-बहिर्मुख आणि आजचं वर्तमान, धगधगतं वास्तव आणि प्रश्न-समस्या टिपणारं व ते माझ्या अनुभव - चिंतन व प्रतिभेद्वारे व्यक्त करणारं असं आहे. येथे मी हे ठसठशीतपणे अधोरेखित करीन की, मी मूलत: एक ललित लेखक आहे. मी कादंबऱ्यातून व ‘पाणी! पाणी!!', 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' मधून जे सांगितलं आहे, ते ललितेतर प्रकारात संशोधन - अभ्यास म्हणूनही मांडता येऊ शकत होतं. नव्हे, तसं अनेकांनी लेखन केलं आहे. पण मला या समस्या व प्रश्न मानवी अंगानं जाणवतात, मनाला भिडतात. पाणी समस्या किती मोठी आहे व त्याची भौगोलिक व पर्यावरणीय कारणे काय आहेत हे प्रश्न ललित लेखक म्हणून मला पडत नाहीत, तर त्यामुळे माणसाच्या जीवनात काय घडतं, त्यांचे नातेसंबंध-परस्परांशी व समाजाशी असलेले कसे

३०६ □ अन्वयार्थ