पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मला आनंद मिळतो का? मला काही त्यातून नवं मिळालं का? ती वाचताना वाचनीय आहे का? मी स्वत: त्यातला काही भाग गाळतो का? वरवर वाचत पुढे जातो, की पूर्ण शब्दन् शब्द वाचत जातो का हे पाहातो. जर वाचक म्हणून मला वाचताना आनंद मिळाला, काही तरी वेगळं मौलिक अनुभवायला मिळालं वा पुन:प्रत्ययाचा, सहअनुभूतीचा अनुभव जिवंत झाला व त्यातला कुठलाही भाग वाचताना मला गाळावासा- स्किप करावासा वाटला नाही, तर मी उत्तम लिहिलं आहे असं वाटतं. हे एक लेखक म्हणून मला असं वाटतं. ती कथा प्रकाशित झाल्यावर वाचकांना ते तसंच वाटतं का? अर्थातच नाही. कारण त्यांचं आकलन, त्यांचा जीवनानुभव, त्यांचे एकूण वाचनसंस्कार व समृद्धी आणि त्यांचे चिंतन, त्यांचे जगण्याचे तत्त्वज्ञान आदीच्या कसोटीवरच वाचक त्यांच्या नकळत वा सहजतेनं साहित्य वाचतात व मग ते त्यांना खूप आवडते किंवा मुळीच आवडत नाही. आवडले तरी काही भाग, काही प्रसंग खटकतात. असं काही होत असणार. माझंही इतरांचं साहित्य वाचताना असंच होतं. म्हणून मला हे विधान करताना मी सत्याचा अपलाप करीत आहे असं वाटत नाही.
 कादंबरी लेखन हे दीर्घ कालावधीचं असतं. विशेषत: जेव्हा तुम्ही समाजातील प्रश्नांवर लिहिता, एका मोठ्या कालखंडाविषयी वा त्यांच्या जगण्याच्या संघर्षाविषयी लिहिता तिथं लेखनप्रक्रिया ही भिन्न असते. तेथे पूरक वाचन, माहिती व चिंतनाची नितांत गरज असते. पुन्हा प्रत्येकाची रीत ही वेगळी असणार- असतेच. मी फार तर माझ्याविषयी सांगू शकेन. जेव्हा कादंबरी तुमच्या अनुभवाचा- कामाचा विषय असते तिथं लेखनासाठी फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. उदाहरण देऊन बोलायचं झालं तर माझी 'अंधेरनगरी' ही कादंबरी नगरपालिकेचा निघृण सत्तासंघर्ष मांडणारी आहे. मी स्वतः प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे, म्हणून ती लिहिताना तो माझ्या जगण्याचा, कामाचा भाग असल्यामुळे व त्यावर त्या कालखंडात सतत विचार-चिंतन होत असल्यामुळे प्रत्यक्ष लिहिताना पूर्वतयारीची गरज नव्हती. ते सहज लिहून झालं. तीच बाब 'ऑक्टोपस'ची म्हणता येईल. मी महसूल विभागात अधिकारी होतो, त्यामुळे तलाठी ते कलेक्टर या पातळीवरचा भ्रष्टाचार व त्याचा व्यक्ती व कुटुंबावरील होणारा परिणाम मी पाहात होतो, त्याचा सामना करीत होतो (म्हणजे स्वत: भ्रष्टाचार न करणे व इतरांचा रोखणे यात माझी बरीच शक्ती पण खर्च पडली आहे) त्यामुळे त्याचे कथाबीज, संघर्ष-बिंदू व तलाठी आणि कलेक्टर ही पात्रे सुचताच मी कादंबरी झपाट्याने पूर्ण केली.

 मात्र 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही बृहद् कादंबरी लिहिताना फार वेळ लागला. मोठी दमछाक झाली. कारण दहशतवाद, इस्लाम मधला मूलतत्त्ववाद, कम्युनिझम व मार्क्सप्रेरित क्रांती (इन्किलाब), जगातील सत्तासंघर्ष, अफगाणिस्थानचा इतिहास,

अन्वयार्थ □ ३०५