पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/294

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केले. काळाच्या पुढे असणाऱ्या ह्या दिग्दर्शकाची म्हणावी तशी दखल त्याच्या हयातीत घेतली गेली नाही. काहीवेळा कालातीत असणाऱ्या कलाकृतींची दखलसुद्धा अनेक वर्षांनी घेतली जाते. गुरुदत्तच्या बऱ्याच सिनेमांच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल. ह्या अर्थाने गुरुदत्तसारख्या कलावंताने त्या काळात जन्म घेणं हीसुद्धा शोकांतिकाच म्हणावी लागते. म्हणूनच नाटककाराने शोकांतिक सिनेमांच्या बादशहालाच आपल्या नाटकाचा नायक करणे यथायोग्य वाटते.
 शोकांतिकेचे दुसरे ठळक वैशिष्ट्य असते ते म्हणजे सर्वगुणसंपन्न असणाऱ्या नायकाची एखादी दुबळी बाजू. जसे शेक्सपिअरच्या किंग लिअरमध्ये लिअर हा सर्वगुणसंपन्न असतो पण त्याचा रागावर ताबा नसणं ही त्याची दुबळी बाजू ठरते. त्याचमुळे कॉर्डेलिया ही त्याची मुलगी त्याच्यापासून दुरावते आणि सर्वार्थानं यशस्वी असणाऱ्या लिअरची शोकांतिका सुरू होते. ज्यांनी ज्यांनी चांगल्या शोकांतिका लिहिल्या त्या त्या नाटककारांचा मानवी मनाचा अभ्यास खूप होता असे आपल्याला दिसून येईल. उत्तम शोकांतिकांमध्ये नायकाची दुबळी बाजू दाखवताना ती परिस्थितीजन्य न दाखवता नायकाच्या स्वभाववैशिष्ट्यांशी संबंधित अशी दुबळी बाजू दाखवली जाताना आपल्याला दिसेल. म्हणून शोकांतिका ह्या एखाद्या व्यक्तिरेखेच्या फक्त आयुष्याचा चरित्रपट न दाखवता त्यांच्या मनाचा पट दाखवत असतात. त्या नायकाच्या मनाचा पटच आपल्याला जास्त आकर्षिक करतो. आणि तिथेच शोकांतिका एका परिपूर्ण आशयाच्या जागी पोहोचत असते. माणसाच्या जगण्यातील अपूर्णतेचे दर्शन आपल्याला त्याच ठिकाणी होते.

 नाटकाराने 'अखेरची रात्र' हे नाटक लिहिताना गुरुदत्तच्या आयुष्यात गीता दत्त आणि वहीदा रहेमान ह्या दोन स्त्रियांवरील त्याच्या प्रेमाला त्याच्या मनाचा कमकुवतपणा म्हणून दाखवलेले आहे. नाटकामध्ये ह्या पात्रांची नावे प्रतिभा आणि प्रेरणा अशी येतात. नाटककाराने नाटक लिहिताना स्वातंत्र्य वापरत ह्या पात्रांची खरी नावे न देता नायक गुरूच्या मनाची दोन रूपे म्हणून अशी नावे दिली आहेत. प्रतिभा आणि प्रेरणा ह्या दोनही स्त्रियांवर प्रेम करणारा गुरू नाटकामध्ये प्रेमाबद्दलच्या त्याच्या मूलभूत प्रेरणा सांगत प्रेमाबद्दलच्या सामाजिक मान्यता आणि खोट्या कल्पनांना विरोध करत राहातो. एका पुरुषाला एकाच वेळी दोन स्त्रिया आवडू शकतात. किंवा एखाद्या स्त्रीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त पुरुष. पण सामाजिक परंपरेची ओझी वाहणाऱ्या माणसांना हे विचार बदफैलीपणाचे वाटू शकतात, पण मनाच्या पातळीवर मात्र ते खरे असू शकतात. ह्या अर्थाने 'अखेरची रात्र' ह्या नाटकाचा नायक प्रेमाच्या तथाकथित सामाजिक परंपरांना धक्का लावू पाहातो. असे म्हणतात की, स्त्री ही जन्मत:च सृजनशील असते. त्यामुळे ती मुलाला जन्म

अन्वयार्थ □ २९५