पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्युरॅसिक पार्क किंवा टर्मिनेटर ही त्याची उदाहरणे. लोक हे सिनेमे घरात बघण्यापेक्षा थिएटरमध्ये जाऊन त्या सिनेमांचा आनंद घेऊ लागले आणि चित्रपट माध्यमाने जणू कात टाकली. अशी कात टाकणे मराठी रंगभूमीला शक्य आहे का? तर माझ्या मते त्याचे उत्तर होय असे आहे. आशय हा नाटकाचा केंद्रबिंदू आहे. जितकी जास्त सखोल आशयनिर्मिती करणारी नाटके रंगमंचावर येतील तितकी रंगभूमी जास्त सशक्त होईल असे माझे मत आहे. नाट्यलेखनामध्ये तंत्र असावेच लागते पण त्याहून अधिक महत्त्वाचा असतो तो आशय. मी एक दिग्दर्शक म्हणून निरनिराळ्या आशयघन संहितांचा शोध घेत असताना माझी ओळख झाली ती लक्ष्मीकांत देशमुख ह्या नाटककाराशी. काही वर्षांपूर्वी मी त्यांचे 'अखेरची रात्र' हे नाटक दिग्दर्शितही केलेले होते, तर 'दूरदर्शन हाजिर हो' हे लहान मुलांसाठी बालनाट्य वाचले होते. 'अखेरची रात्र' आणि 'दूरदर्शन हाजिर हो' ह्या नाटककार लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या नाट्यसंहितावरची माझी काही निरीक्षणे.
 'अखेरची रात्र' हे नाटक भारतीय चित्रपटसृष्टीतील महान कलावंत गुरुदत्त ह्यांच्या आयुष्यातील शेवटच्या रात्री काय घडले असावे ह्या कल्पनेवर बेतलेले आहे. नाटककाराने ह्या मनस्वी कलावंताच्या आयुष्यातील शेवटची रात्र दाखवताना काही स्वातंत्र्येही घेतली आहेत. नाटककाराचा मूळ हेतू त्या रात्री प्रत्यक्ष गुरुदत्तच्या आयुष्यात काय घडले असेल त्याच्या घटना दाखवण्यापेक्षा त्या रात्री ह्या मनस्वी कलाकाराच्या मनात कोणकोणते विचार येऊन गेले असतील, हा आहे. मराठी रंगभूमीवर शोकांतिका ह्या तशा तुलनेने कमीच आढळतात. बऱ्याचशा पाश्चात्त्य नाटककारांकडून उधार घेतलेल्या. नाटककाराने गुरुदत्त ह्या व्यक्तिरेखेवर नाटक लिहिण्यात प्रामुख्याने दोन गोष्टी दिसतात. पहिली म्हणजे नाटककाराची ओरिजनालिटी आणि दुसरी म्हणजे शोकांतिका ह्या नाट्य प्रकाराचा चांगला अभ्यास.
 शोकांतिकेमध्ये नायकाचा प्रवास हा फक्त अधोगतीच्या दिशेने असत नाही तर त्या नायकाने आयुष्यात खूप यशही मिळवलेले असते. जितक्या उंचीवर नायकाच्या प्रतिमेची राजमान्यता, समाजमान्यता असते तितकी त्याची नियतीने केलेली शोकांतिका मोठी ठरते; म्हणूनच बऱ्याचशा शोकांतिकामध्ये नायक हा बहुधा राजा असतो. त्याने नियतीविरुद्ध केलेला प्रवास जरी त्याची शोकांतिका ठरली तरी त्याचा तो प्रवास आपल्याला हवाहवासा वाटतो.

 गुरुदत्त हा कलावंत हा नियतीशरण नव्हता, तसा तो तद्दन गल्लाभरू चित्रपट काढणाराही नव्हता. त्याने चित्रपटमाध्यमात केलेले प्रयोग नावीन्यपूर्ण होते. त्याने ह्या उद्योगात प्रचंड पैसा जरी मिळवला नसला तरी अनेक सिनेरसिकांनी त्याला 'दिग्दर्शकांचा राजा' ही उपाधी दिली. ह्या अर्थाने सिनेरसिकांवर त्याने राज्य

२९४ □ अन्वयार्थ