पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/295

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देऊ शकते. पुरुष मात्र स्वत:च्या सृजनशील प्रेरणा विकसित करत राहिला तरी अखेरपर्यंत अपूर्णच राहातो. असा अखेरपर्यंत सृजनासाठी प्रतिभा आणि प्रेरणावर अवलंबून असलेला गुरू शेवटी निराशेच्या खोल गर्तेत जातो. दारूच्या आहारी जातो. बऱ्याचदा दारू पिणे समाजात कितीही वाईट समजले जात असले तरी ज्या माणसाला आजूबाजूचे भयंकर वास्तव विसरायचे असते त्याच्यासाठी ते औषध ठरते. कोणताही मार्ग नसलेला गुरू शेवटी दारूच्याच आहारी जात स्वत:ची जीवनयात्रा संपवतो.<>br  लक्ष्मीकांत देशमुख यांनी गुरुदत्त या अतिशय संवेदनाशील, प्रतिभावंत कलाकाराची शोकांतिका मांडत असताना त्याच्या व्यक्तिमत्त्वातील गुणांना आणि अवगुणांना नाट्यात्मतेची जोड दिली आहे. नाटककार जेव्हा वास्तवात होऊन गेलेल्या व्यक्तिरेखेवर नाटक निर्माण करतो तेव्हा त्या व्यक्तिरेखेच्या गुणांचा किंवा त्यानं केलेल्या कार्याचा उदोउदो करण्याने त्यातील नाट्यात्म मूल्य हरवण्याचा धोका असतो. 'अखेरची रात्र'मध्ये मात्र गुरू हा जसा प्रतिभावान दाखवला आहे तसेच त्याच्यातील दोषही उघडपणे मांडण्यात आले आहेत. गुरुदत्त ह्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात न पडता त्या व्यक्तिरेखेचे सारासार मूल्यमापन करण्याला नाटककार प्राधान्य देतो.
 शोकांतिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भावनाप्रधानता. नायकाची शोकांतिका आपल्याला भावनिक करते. प्रेक्षक जितका भावनिक होईल तितकी ती कलाकृती श्रेष्ठ अशी एक धारणा असते. शोकांतिका म्हणजे कॅथार्सिस. म्हणजेच कलाकृती पाहाताना प्रेक्षक जणू काही आपल्याच मनातील भावनांचा निचरा करत असतो. हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन नाटककार नाट्यप्रसंगांची निर्मिती करत असतो. 'अखेरची रात्र' या नाटकात मात्र नायक फक्त भावनिक पातळीवर न राहाता वैचारिक पातळीवरही येतो. गुरूच्या स्वत:च्या शोधात त्याला येत गेलेले आत्मभान या कलाकृतीला वैचारिक पातळीवर नेते. शोकांतिकांमध्ये वैचारिक आणि भावनिक अशा दोन्ही पातळ्यांवर कलाकृती जाणे हे जास्त महत्त्वाचे.

 नाटकामध्ये शब्द महत्त्वाचा असतो असे मानणारा मी दिग्दर्शक आहे नाटककाराने लिहलेला शब्द अभिनेता कशा पद्धतीने प्रेक्षकांपुढे सादर करतो यावर बरेचसे नाटकाचे यश अवलंबून असते. शोकांतिकांचे एक वैशिष्ट्य असेही असते ते म्हणजे त्याची काव्यात्म भाषाशैली. लेखन करणाऱ्याला हा प्रकार आव्हानात्मक असतोच आणि अभिनेत्यालासुद्धा एखाद्या व्यक्तिरेखेच्या मनाचे कंगोरे दाखवत असताना ही काव्यात्म भाषा आपल्याला त्या व्यक्तिरेखेच्या मनात नेऊन ठेवते. बऱ्याचदा शोकांतिकांमधील स्वगते अनेक नटांना भुरळ घालतात. 'अखेरची रात्र'मध्ये

२९६ □ अन्वयार्थ