पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केलेल्याप्रमाणे दिसतात!)
 देशमुखांची जीवनदृष्टी अत्यंत नितळ सौंदर्यवादी आहे. 'माझ्या जगण्याचे तत्त्वज्ञान' विषयावर व्याख्यानात ते म्हणाले होते की, “मी सौंदर्यासक्त आहे. या सौंदर्यासक्त वृत्तीने माझ्या जगण्याला बळ मिळते. आणि स्त्री मला अनेक नात्याने व रूपाने भेटते. तिचे सौंदर्य मला प्रेरक ठरते.” (गणेशोत्सव : जनता सहकारी बँक व्याख्यानमाला सोलापूर, ३० ऑगस्ट ९४). सौंदर्यासक्त असले तर संदिग्धपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणून पर्यवसायी साहित्याचा विशेष नाही. आपले जीवन, आपली वृत्ती (व्यवसाय साधन) आणि साहित्य निर्मिती यात अंतर ते करीत नाहीत. आणि म्हणूनच रसरशीत जीवनासक्ती 'अंतरीच्या गूढगर्भी कथापुस्तकाची प्रमुख प्रेरणा झाली आहे. हा नायक आत्मरत असल्याने ते कथापुस्तकही काव्यात्म झाले आहे. यामध्ये अधीरता, हुरहुर आणि तरीही नायक स्व-जीवनाविषयी सजग असलेला दिसतो. 'अंतरीच्या गूढगर्भी' तील सर्व सतरा कथांचा नायक एकटा 'मी' च आहे. तो 'सतरा वेळा' आपल्या अनेकविध तळा - कळांमधून व्यक्त झाला आहे.
 देशमुखांची काव्यात्मशैली आणि विशिष्ट असा सौदर्यासक्त संवेदनस्वभाव त्या एकाच संग्रहात ‘ग्रथित' (इथे ग्रथित म्हणजे शब्दबद्ध - असा अर्थ) झाला आहे. या संग्रहानंतर त्यांचा संवेदनस्वभाव व पिंडधर्मही पालवलेला व पालटलेला दिसतो. नंतरच्या कथेची प्रेरणा व प्रयोजन हे समाजस्थितीचे दर्शन, लोककल्याण, जागृती राहिली आहे. आपले जगणे आणि आपली निर्मिती यामधील अंतर त्यांनी मिटवलेले आहे. जीवनोद्देश आणि साहित्यप्रयोजन हे एकच साधन केले आहे. 'पाणी! पाणी!', 'नंबर वन', 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या कथापुस्तकांत आपल्या प्रतिभाधर्माची ऊर्जा समाजाच्या उन्नयनासाठी उपयोगात आणली आहे. आणि या तिन्ही कथांपुस्तकांतील कथानायक हा प्रशासकीय अधिकारी आहे. तो आपल्या जनतेकडे पालकत्वाच्या, बापाच्या भूमिकेमधून पाहतो आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी सामान्यातिसामान्यांविषयीची ममतेची भावना प्रकट झालेली आहे.
 'अंतरीच्या गूढगर्भी' त १७ कथा, 'पाणी! पाणी'त - १४, ‘नंबर वन'मध्ये १० व 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी'त ८ कथा व दिवाळी २०१४ च्या वेगवेगळ्या अंकात प्रकाशित ६ कथा अशा आज एकंदर ६० एक कथा उपलब्ध आहेत. प्रस्तुत लेखात प्रत्येक कथेचा विचार केलेला नाही. विश्लेषणाच्या उपयुक्ततेनुसार व सोयीनुसारच कथा घेतलेल्या आहेत.


३० अन्वयार्थ