पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उद्देशाने प्रेरित झालेल्या कथा आहेत. म्हणून आधुनिक काळातील संतत्वाचा वेश असे या कथांविषयी म्हणता येईल.
 कथाकारांनीच आपल्या कथा 'थीमबेस्ट' आहेत, असे म्हटले आहे. वरील प्रबोधनविचार थीमबेस्डस लागू होतो. संतांना समाजाविषयी कणव, कळवळा होता. 'थीमबेस्ड' ची जातकुळी हीच असते. जेव्हा कणव आणि कळवळा यांचा अश्रू पुसण्याचा उद्देश असतो तेव्हा अशा स्वरूपाच्या वाङ्मयाचे मूल्यही त्यातच शोधावे लागते. साहित्याच्या तत्त्वज्ञानामधून ते पारखून पाहायचे नसते. याउलट देशमुखांच्या थीमबेस्ड वा प्रबोधनपर मूल्य असलेल्या कथांच्या वाङ्मयमूल्यांची विचक्षणा केली तरीही त्या सरस व दीप्तिमान वाटतात. कलात्म बांधणीतून एकही सुटलेली अगर ढिसाळ रचना झालेली नाही. कलात्मदृष्ट्या प्रत्येक कथा तर्कसंगत व रचनागत सौंदर्य असलेली अशीच आहे. प्रबोधन वा थीमबेस वाङ्मय रसवत्तेच्या दृष्टीने मिळमिळीत होते, पण इथे हाही दोष उत्पन्न होत नाही. 'पाणी! पाणी!' हा आक्रोश चिंतन करायला प्रवृत्त करतो; 'नंबर बन' मधील खेळाडूंमधील माणसांच्या कथा वाचताना अनेक प्रश्न उपस्थित होतात तर 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' तील कौर्याच्या परमसीमेने काळीज कापते. या रचनेतील नाट्याचा आणि भावनिक संघर्षाचा एक थरार आपण अनुभव म्हणून या कथा प्रबोधनाला वाङ्मयमूल्य प्राप्त करून देतात.

॥३॥

 देशमुखांच्या कथेला निश्चित असा विकासक्रम आहे. दर एका कथा-पुस्तकात नवीन विषय, नवीन आशय आणि नवा थीमबेस-रेनिसाँ-असे कथालेखनाचे सूत्र दिसून येते. 'फिरूनी नवी जन्मेन मी' हा त्यांचा थीमबेस आहे. 'माझ्या घरी मी पाहुणी' का, हा त्यांच्या कथेच्या अवकाशातील शोधाचा विषय होतो.
 कूस उजवणे व कूस बदलणे हे शब्दप्रयोग वेगळ्या संदर्भात उपयोजले जात असले तरी दरवेळेला नवीन रंगारूपाचे कथाविषय असल्याने येथे हे शब्द उचितच वाटतात. 'अंतरीच्या गूढगर्भी' हा लक्ष्मीकांत देशमुखांचा पहिला संग्रह. यावर रोमँटिक अटिट्यूडची छाया लख्खपणे दिसून येते. या कथापुस्तकात एक आत्मरत 'मी' आहे. तो म्हणतो, “स्वत:बद्दल सांगणं तितकंस योग्य नाही. तरीही आत्मस्तुतीचा दोष पत्करून मला हे नमूद करावेसे वाटते की, माझं व्यक्तिमत्त्व बरचं वैविध्यपूर्ण आहे. तसा दिसायला मी गोरागोमटा आहे थोडासा फॅटी असलो असलो तरी छाप पडावी अशी उंची व तब्येत आहे." (अंतरीच्या गूढगर्भी : माझे अबोलणेही : ११७) हे स्वच्या आत्मरत वृत्तीचे दर्शकच आहे. (कथाकारही असेच वर्णन

अन्वयार्थ । २९