पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
॥४॥

 'अंतरीच्या गूढ गर्भी' त सेक्स भावनेचे आकर्षण प्रकर्षाने जाणवते. प्रेम भावना ही आदिम भावना आहे. ती स्त्री-पुरुष सहवासातून व्यक्त होते. संग्रहामधील तीन कथानायक अविवाहित आहेत. पीएच. डी. संशोधन मार्गदर्शकाशी न पटल्याने बँकेची चालून आलेली नोकरी धरतो आणि मैत्रिणींचे स्मरण करतो. त्यांच्याशी पत्रव्यवहारही करतो. “असं म्हणतात की हा प्लॉटोनिक प्रेमाचा प्रकार आहे व आज तो कालबाह्य आहे. आजचं मॉडर्न प्रेम शरीराच्या माध्यमातून जमतं व फुलतं. असेलही कदाचित ..... पण माझा तर असा अनुभव आहे. मी मराठवाड्याचा आहे व एक औरंगाबाद शहर सोडलं तर इतरत्र साधं मुलीशी चार शब्द बोलणेही दुर्मीळ असतं. पुण्याला काय चाललंय याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. खुद्द औरंगाबादही खूपच मॉडर्न बनलं आहे. माझे अनेक मित्र आपल्या अफेअरची रसीली चर्चा माझ्यापुढे करतात. खोटं कशाला सांगू, मला त्यांचा हेवा वाटतो.” (स्वत:च्या मनाचा एक्सरे रिपोर्ट : ३५) अशी सुप्त इच्छा मनात आहेच. त्यांच्या सहवासात तो फुलारतो, त्याची वृत्ती-प्रवृत्ती बहरून येते. सेक्स भावनेचे मुक्त चिंतन आहे. ती भावना म्हणजे काय यावर समंजसपणे, मोकळेपणाने कथारूपामधून विचार प्रकट झाले आहेत. स्त्री-पुरुष मीलनाला सृजनक्रीडा समजली आहे. त्यामुळे विवाहाशिवाय आलेले मातृत्व मोठ्या आवडीने स्वीकारले जाते. रिटा म्हणते. “माझं मातृत्व स्वैराचार नव्हता. मी वासनेला नेहमीच दुय्यम-सेकंडरी समजते. पण माझ्यासारखीला - जी मॅच्युरिटीच्या एका विविक्षित पॉइन्टपर्यंत पोहेचलेली आहे - मला सेक्स - वासना कधीही प्रथम दर्जाची, सर्वाधिक निकडीची वाटणार नाही. ही विकृती खचितच नाही. कारण मलाही देहधर्म आहेत. पण देहाची कायमची सोय व्हावी म्हणून लग्नाचं बंधन मला साफ नामंजूर आहे.” (सृजन कसा तडफड करी! पृ. १६३)
 सेक्स भावनेचा अत्यंत मोकळेपणा 'बास्टर्ड' कथेत आला आहे. शेवता पारधीण काळीभोर पण आकर्षक बांधा आहे. तिच्या दारू गाळण्याच्या कौशल्यामुळे नानासाहेब देशमुख तिला आपलेसे करतो. तीच त्याला ठेवून घेते. त्याच्यापासून तिला गोरागोमटा मुलगा होतो. देशमुखाच्या मृत्यूनंतर ती पाटलाला ठेवून घेते. याबद्दल तिचा मुलगा बबन विचारतो, तेव्हा ती आपल्या मुलालाच म्हणते, “तुला आज कळलं व्हय? आपलं समदं खुल्लम खुल्ला असतंया. अजून मी बुढी नाय झाले. अजून आग हाय इथं.” आग असणाऱ्या जागेला हात लावून मुलाशी बोलणारी बाई विरळाच! या शेवंताच्याविरुद्ध वर्तनाची देशमुखाची पत्नी, आई आणि 'हे खेळ मनाचे सारे' कथेमधील श्रीची आई. तरुणपणी विधवा झाल्याने लहानशा श्रीवर लक्ष केंद्रित करते

अन्वयार्थ । ३१