पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्या कामाची माहिती घेणं, कामचुकारांना अस्खलित शिव्या हासडणं, प्रसंगी चाबकानं फोडून काढणं, क्वचित कामावरून काढणं, गावातून हाकलून लावणं.... असं त्याचं दुपारपर्यंत काम चालायचं. खांद्यावर रुळणारा चामड्याचा चाबूक, पायात काबूलच्या कोना बाजारातून आणलेले युरोपियन गमबूट, लष्करी धाटणीचा व शेता-मळ्यांतून हिंडण्यासाठी उपयुक्त असलेला तंग सुरवार व बंडीचा पोशाख, कमरेला आवळलेला पट्टा, भरघोस गलमिशा असा त्याचा रुबाब पाहिला की कुळांच्या छातीत धडकी भरायची.” (पृ. ०६) या वर्णनात सईदचा दिनक्रम आला आहे. यातून त्याचा वर्तनव्यवहार तसेच स्वभाव-विशेषही येतात. व्यक्तीच्या स्वभाववर्णनानंतर त्याच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाचे वर्णन येते. या वर्णनात अनावश्यक तपशील कुठेही येत नाही. अतिशय सामान्य प्रसंग चित्रित करून जीवनदर्शन अर्थपूर्ण बनविले आहे. त्यामुळे या वर्णनपरतेला आशयाभिव्यक्तीचे परिमाण प्राप्त होते.
 कथन, संवाद तसेच वर्णनातून घटनाप्रसंग निवेदित करताना भाष्यं येतात. ही भाष्यं मुस्लीम धर्माच्या आणि मार्क्सवादाच्या पोथीनिष्ठतेच्या संबंधाने येतात. ही भाष्यं लेखकाच्या वैचारिकतेची, त्याने केलेल्या चिंतनाची साक्ष देतात. या संपूर्ण समाजाचे कादंबरीगत समाजवास्तवाचे आतून दर्शन होते. यासाठी कादंबरी संरचनेत कथनाच्या विविधांगी शक्यता वापरल्या आहेत. फोनवरील संवाद, किंवा वेगवेगळ्या माध्यमातील 'बातमी'चाही वापर मोठ्या कौशल्याने केला आहे त्यामुळे दोन स्थळकाळ एकदम जोडले जाऊन आशय प्रवाही होतो. हे सर्व कथन आशयभिव्यक्तीच्या मागणीतून होते. विविध दिशांनी फाकत जाणारा आशय या कथनातून साकार होतो. व्यापक परिप्रेक्षातनू साकारणारे आशयदृष्य या कथनव्यवस्थेने तोलून धरले आहे.

अन्वयार्थ □ २४७