पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भ्रष्ट व्यवस्थेचे शोकात्म दर्शन

प्रा. अजित साळुखे

मराठी साहित्यातील मोजक्याच पण निवडक विषयांवर ताकदीच्या कादंबऱ्या लिहून स्वत:चे स्थान मिळवणाऱ्या लेखकांमध्ये लक्ष्मीकांत देशमुख यांचे स्थान अग्रणी आहे. विशेषत: मराठी साहित्यिकांच्या वेगाने गमावत चाललेल्या सामाजिक जाणिवांच्या पार्श्वभूमीवर विद्यमान समाजातील उग्र असलेल्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे, त्यातील समकालीन दाहक प्रश्न मुखर करण्याचे महत्त्वाचे कार्य लक्ष्मीकांत देशमुख यांच्याकडून होत आहे. त्यातूनही ठळकपणे समोर येणारी बाब म्हणजे भारतीय प्रशासन सेवेत सनदी अधिकारी म्हणून काम करताना स्वत:ची संवेदनशीलता व विवेक जागृत ठेवून अभ्यासपूर्ण पद्धतीने तरीही बोजड न वाटता विविध समस्यांचा वेध घेणारे लेखन देशमुख करीत आहेत.
 या पार्श्वभूमीवर या दशकाच्या पूर्वार्धात देशमुखांच्या 'भ्रष्टाचार' या विषयावर लिहिलेली लघु - कादंबरी 'ऑक्टोपस' चे विश्लेषण करणे ही मराठी साहित्यातील अनिवार्य गोष्ट ठरते. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भारतीय समाजात अलीकडच्या काळात मोठे रणकंदन उभे राहिलेले असताना व राजकीय सत्ताबदलापर्यंत या एका मुद्द्यावर भारतीय जनमानसाचा प्रवास झालेला असताना ही कादंबरी महत्त्वाची ठरते.

 कादंबरीचा नायक आहे जिल्हाधिकारी पदावर काम करीत असलेला मध्यमवयीन व आदर्शवादी आनंद पाटील. त्याच्या जोडीला दुसरा समांतर नायक आहे आनंद पाटील यांचा आदर्शवाद हे सर्वोच्च मूल्य मानून उभा राहिलेला तलाठी भगवान काकडे. कादंबरीत भ्रष्टाचाराच्या अजस्र ऑक्टोपसच्या विळख्याशी लढताना हे दोन्ही नायक विविध स्तरांवर अपयशी होत जातात व अखेरीस वैफल्यग्रस्त होऊन व्यवस्थेला शरण जातात किंवा पलायतवादी भूमिका स्वीकारतात. तसेच दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेला तलाठी भगवान काकडे याचा मुलगा आनंद

२४८ □ अन्वयार्थ