पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अफगाण निर्वासित आहेत, तोवर त्यांचा इथला रस कमी होणं शक्य नाही. त्यांच्या देशकारणाचा पायाच मुळी इस्लाम. आपल्या देशात कम्युनिस्ट विचारधारा मजबूत होणं त्यांना परवडणारं नाही. त्या भीतीपोटी झिया जिहादी भूत जिवंत ठेवायचा प्रयत्न करणारच. तसंच सौदी अरेबिया, गल्फ आणि इस्लामी खोमेनीचा इराणही मुजाहिदीनाना मदत करीत राहणार. रूसी सेनेविना आपण त्यांचा मुकाबला करू शकू?"
 "त्याचं ब्लॅक अँड व्हाईट असं साफ उत्तर आजच्या घडीला माझ्याजवळ नाहीय.” स्वच्छ कबुली देत नजीब म्हणाला होता, “पण प्रत्येक अनुकूल संधीचा लाभ उठवीत आपली सौर क्रांती मजबूत करणं व मुजाहिदींचा तात्त्विक पाया किती पोकळ आहे, हे अवामला पटवून देणं या दुहेरी नीतीनं काम केलं पाहिजे. त्याचवेळी युद्धभूमीवर मुजाहिदीनांना परास्त केलं पाहिजे.... पुढील वर्ष-सहा महिने निर्णायक आहेत. अन्वर, आपण दोन वर्ष टिकाव धरू शकलो तर जिंकलो. फक्त हा काळ कठीण परीक्षेचा आहे." त्यात तुम्ही जरूर उत्तीर्ण व्हाल सर.” अन्वर मनापासून म्हणाला होता, “वीर धैर्यशील पुरुषाला नेहमी यश मिळतं.' (पृ. ३३५, ३३६) या पद्धतीने कादंबरीभर चर्चा येतात. बहुतांश आशय पात्रांच्या संवादातूनच अभिव्यक्त होतो. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय संदर्भात घडणाऱ्या घडामोडींचे, व्यक्तीच्या संदर्भातील मनोव्यापाराचे दर्शन या संवादातून घडते. अफगाणिस्तानातील धार्मिक कट्टरतावाद, मार्क्सवादी जाणिवा, स्त्रियांचे असाहाय्य जगणे यासंबंधीच्या मुस्लीम जगतातील समूहदर्शन, त्याचबरोबर त्याला असणारे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे दाब या चर्चातून साकार होतात. आशय व्यापक स्तरावर पोहचतो; परस्परविरोधी आवाज यात मिसळले जातात. त्यामुळे ही कादंबरी अनेक आवाजी होते. पात्रांच्या संवादलेखनाचा आणखी एक विशेष नोंदवता येईल की, पात्रांच्या बोलण्यातून त्याचे मनोविश्व, वैचारिकता जशी कळते त्याच पद्धतीने प्रसंगही या बोलण्यातूनच उभा केला जातो. घटना आणि तिचे कथन एकाच काळात येते हे याच संवादाचे वैशिष्ट्य आहे.

 यथोचित वर्णन हा आणखी विशेष या कादंबरीच्या कथनव्यवस्थेच्या बाबतीत नोंदवता येईल. घटना, प्रसंग, निसर्ग वर्णन किंवा व्यक्तिरेखा संदर्भाने येणाऱ्या वर्णनाने या कथनाला प्रत्ययकारिता प्राप्त होते. “पाना-फुलांवर व गुराढोरांवर प्रेम करणारा, त्यांची निगा राखणारा, त्यांना जपणारा सईद शेतात राबणाऱ्या कुळांसाठी मात्र अस्सल जमीनदार होता. तो रोज सकाळी नाष्टा करून जमीनदारीच्या गावांची आळीपाळीनं पाहणी करायला निघायचा. एक एक शेत, पीक व फळबाग काळजीपूर्वक निरखायचा. पाच हजार जिदाब जमिनीवर अनेक शेतमजूर कुटुंबं कामाला असायची.

२४६ □ अन्वयार्थ