पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरू केलेला लाठीहल्ला. घाबरलेल्या विद्यार्थ्यांची सुरू झालेली पळापळ.. चेंगराचेंगरी, पोलिसांचा वाढता उन्माद..... अचानक एका मागोमाग दोन तीन गावठी हात बॉम्बचा स्फोट. काही विद्यार्थी व दोन पोलिसांचे त्यामुळे जखमी होऊन कोसळणं... बेभानं जमावाकडून त्यांची होणारी तुडवातुडवी... फागरचा आदेश ... गोष्टीबार आसंमतात उमटलेल्या करुण किंकाळ्या ‘या अल्ला'. पाहता पाहता विद्यार्थीवर्ग विखुरला जाणं.... आणि पार्लमेंट हाऊससमोर चार मृत विद्यार्थी, त्यात एक मुलगी आणि शंभर दीडशे घायाळ, जखमी विद्यार्थी...' (पृ. ७५) या घटनाप्रसंगातील बारीकसारीक तपशील दिले आहेत. त्यामुळे स्थळकालासहित घटनाप्रसंग उभा राहतो. कथाबाह्य निवेदक सर्वसाक्षीत्वाने घटना दाखवत असल्याने वाचकांसमोर प्रसंग घडतो आहे असे वाटते तर कधी हाच निवेदक पात्रांच्या मनोविश्वातही प्रवेश करून त्यांच्या अंतर्मनाचे तळकोपरे प्रकाशमान करतो.
 “रात्रभर अन्वरला झोप आली नाही. टीचभर इवल्याशा हृदयात आनंदाच्या व भावी अफगाणिस्तानच्या आदर्श समाजवादी स्थितीबद्दलच्या स्वप्नांच्या कल्पनांची कारंजी भुईभुई नाचत होती. त्यामुळे डोळ्यांतील झोप कुठे गेली होती कुणास ठाऊक, पण ताण नव्हता. पर्वाही नव्हती.” (पृ. ७७) येथे कथाबाह्य निवेदक कथांतर्गत निवेदकाच्या शक्यता वापरताना दिसतो. तेही सहजतेने येते. कथनाच्या दोन्ही पद्धतींच्या शक्यता आजमावत कथा आशय जोरकसपणे अभिव्यक्त करण्याकडे लेखकाचे कौशल्य दिसते. या कथन पद्धतीच्या सर्व शक्यता अजमावत कथाविश्वाकडे व्यापक परिप्रेक्षातून पाहतो. व्यक्तिरेखा आणि घटनाप्रसंग निर्मितीमध्ये निवेदकाच्या व्यापक दृष्टी प्राप्त होते. या आपल्या सामर्थ्यांचा उपयोग करत कादंबरीचा आशय सामाजिक वास्तवाला व्यापक पटावर चित्रित केला जातो. समूह जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घटना घडामोडींना या कथपद्धतींमधून समग्रतेने कवेत घेण्यात येते.

 कथाबाह्य आणि कथांतर्गत कथन पद्धतीच्या सजग वापरातून साकार होणाऱ्या या कादंबरीत संवाद व चर्चा व कथनरूपाचाही उपयोग मोठ्या प्रमाणावर केला आहे पात्रांच्यामधील गुंतागुंतीचे संबंध या चर्चात्मक रूपातून साकार होतात. सामाजिक, राजकीय, धार्मिक, दहशतीच्या पातळीवरील कादंबरीगत वास्तव उभे राहते. कादंबरीत समाजवास्तवाचा तळठाव, तत्त्वशोधन करण्यास या चर्चांचा उपयोग होतो. पात्रांमधील चर्चामुळे आशयाभिव्यक्तीला अनेक परिमाणे प्राप्त होतात. पात्रांच्या क्रिया-प्रतिक्रिया यातून दुसऱ्या प्रदेशातील अनुभवविश्व उलगडण्यास या संवादांचा उपयोग होतो. एकाच घटनेकडे अनेक संभाव्य कोनातून बघणे लेखकाला शक्य होते. “पण सर, पाकिस्तान चूप बसेल? त्यांच्या भूमीवर लाखो

अन्वयार्थ □ २४५