पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्रिया - प्रतिक्रिया, उलाघाल व्यक्त करतो. कादंबरीकार स्वत:शी वास्तवाचे आकलन करून घेतो, त्याचा अर्थ लावतो, आणि मग त्याचे चित्रण करतो हे चित्रण करताना कथनाच्या निवेदनाच्या कोणत्या पद्धती वापरायच्या हेही ठरवतो. (वसंत डहाके : मराठीतील कथनरूपे पृ. १२७) हे ठरविणे कादंबरीच्या बाबतीत महत्त्वाचे असते. या निवेदनाच्या कृतीतून हा सगळा व्यवहार अभिव्यक्त होत असतो. कादंबरीतील कथानक घटना आणि पात्र कथनातूनच आविष्कृत होतात. त्यांच्या अवतरण्याचे महत्त्वाचे सूत्र हे कादंबरीतील कथनतंत्रामध्ये असते. कादंबरीतील जग कथनातून वाचकापुढे येते. म्हणजे या कथनातून कादंबरीतील कथा आकार घेते. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या बृहतकादंबरी संरचनेच्या आशयाचा आविष्कार करताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी कथाबाह्य (तृतीय पुरुषी) कथन पद्धतीचा वापर प्रामुख्याने केला आहे. समूहजीवनाची वाटचाल व्यापक पटावर चित्रित करताना कथनासाठी हा कथाबाह्य निवेदक उपयुक्त ठरतो.
 कथाबाह्य निवेदन असणाऱ्या या कादंबरीत कथांतर्गत निवेदनाचाही वापर होतो. लक्ष्मीकांत देशमुख यांनी कथाबाह्य निवेदनाबरोबरच कथांतर्गत निवेदनाच्या शक्यता वापरल्या आहेत. या दोन्ही पद्धतींच्या सीमारेषा धूसर करून पात्राचा भोवताल आणि त्याची भावस्थिती प्रभावीपणे व्यक्त केली आहे. कादंबरीची सुरुवात, “कितीतरी वेळ अन्वर दोन्ही हातांच्या तळव्यांच्या उशीवर डोकं ठेवून अस्तास जाणाऱ्या फिकुटलेल्या चंद्रकोरीकडे पाहात स्वस्थ पडून होता. अंगावर अम्मीनं स्वत:च्या हातानं विणलेली उबदार मखमली रजई होती. त्यामुळे पहाटेच्या थंडावा सुखदायी वाटत होता. पगमानला आलं की, उन्हाळ्याच्या दिवसांत घराच्या समोरील अंगणात देवदार, पाईन व चिनारच्या झाडांनी सावल्या धरलेल्या मोकळ्या जागेत नवारीचा लाकडी पलंग टाकून झोपायची त्याची जुनी सवय.” (पृ. ०१) या पद्धतीने होते. तेथे कथाबाह्य निवेदन आणि कथांतर्गत निवेदन यांची सरमिसळ दिसते. निवेदक अन्वरविषयी सांगतो. पगमानची त्याची जुनी झोपायची सवय सांगतो. तसेच ‘पहाटेचा थंडावा सुखदायी होता.' हे अन्वरचे वाटणेही निवदेकच सांगतो. तृतीयपुरुषी निवेदनात आत्मनिवेदनाची वैशिष्ट्यं सहजपणे येतात.

 कथाबाह्य निवेदनाबरोबरच कथांतर्गत निवेदनाच्या शक्यता वापरल्या आहेत या दोन्ही कथनपद्धतींचा आशयाच्या गरजेतून उपयोग होतो. समाजवास्तवाची तपशिलात मांडणी करताना कथाबाह्य निवेदनाच उपयोग केला आहे उदा. “अचानक विद्यार्थ्यातून पोलिसांच्या दिशेनं एक दगड येतो, पोलिस काठ्या सज्ज करीत पुढे होतात. समूहाची सुरू झालेली रेटारेटी. पुन्हा काही दगड. दोन पोलिसांची डोकी फुटून रक्ताची वाहू लागलेली धार, लाल झालेले चेहरे, पोलीस इन्पेक्टरचा हुकूम ‘अॅटॅक'. पोलिसांनी

२४४ □ अन्वयार्थ