पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'इन्किलाब विरुद्ध जिहाद'ची कथनव्यवस्था



दत्ता घोलप


 लक्ष्मीकांत देशमुख यांची 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' (२००४) ही एका वेगळ्या विषयावरची कादंबरी आहे. या कादंबरीत एका विशिष्ट भूप्रदेशातील निश्चित काळातील समाजस्थिती आणि समाजाच्या विविध स्तरावरील अंत:-संबंध या अनुषंगाने येणारे सत्यशोधन या संबंधाने आशयाचा विचार येतो. अफगाणिस्तानातील जवळ जवळ पन्नास वर्षांच्या राजकीय स्थित्यंतराला कवेत घेत हा आशय आकाराला आला आहे. हा आशय विविध सामाजिक स्तरांना, मानवी संबंधातील जगण्याच्या पातळ्यांना स्पर्शत जातो. अफगाणिस्तानातील हे जीवनदर्शन सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्षात घडविले असून यामागील आंतरराष्ट्रीय राजकारणाची पार्श्वभूमीही उलगडून दाखविली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, धर्मकारण, दहशतवाद आणि त्याचा परक्या भूमीवरील उच्छाद हे मराठी कादंबरीच्या इतिहासात हे प्रथमच आलेले आहे. हा सबंध अवकाश उभा करताना वापरलेली कथनव्यवस्था, स्वीकारलेला रूपबंध महत्त्वपूर्ण आहे.

 कादंबरी विस्तृत अवकाशात घडत, विकास पावत असते. अनेक केंद्र आशयांची सजगतेने मांडणी करताना लेखक कथनाच्या विविध पद्धतींचा तारतम्याने उपयोग करत असतो. कादंबरी कथनरूपाचा अन्वयार्थ लावताना हे वेगळेपण विचारात घ्यावे लागते. “आधुनिक काळातील कादंबरीकडून वास्तवचित्रणाची अपेक्षा असते. कादंबरीत वाचकांना खरेखुरे वाटावे असे एक जग उभे केलेले असते. वास्तव हे अनेक पदरी, अनेक केंद्री असते. स्थळ - काल - घटिते यांच्या साहाय्याने कादंबरीकार वास्तवाची रचना करतो. बाह्य जगातील व्यक्तींशी, स्थळांशी, घटितांशी साधर्म्य हा वास्तवाविषयीचा एक दृष्टिकोन आहे. मन आणि विचार असलेल्या विविध व्यक्तींची समजात गुंतागुंत असते. कादंबरीकार केवळ घटनांचे चित्रण करीत नसतो, तर त्या घटनांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींच्या मनांचीही

अन्वयार्थ □ २४३