पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अन्वर पगमानी, हा कादंबरीचा नायक म्हटला पाहिजे. यालाच कादंबरीत सर्वाधिक जागा, स्पेस मिळाली आहे, हा समतेच्या विचाराला स्वीकारणारा आणि मुख्य म्हणजे विचारापेक्षा व्यक्ती महत्त्वाची आहे हे मानणारा सामान्य अफगाणी माणूस आहे. अन्वर हाच खरा कादंबरीचा प्रोटागॉनिस्ट आहे. कादंबरी त्याच्या युवावस्थेपासून तो त्याच्या प्रौढावस्थेपर्यंतची सारी भावनिक स्पंदनं टिपते. अन्वरच्या जगण्याची परवड आणि अफगाणिस्थानची परवड एकमेकांत गुंफली गेली आहे.

 अफगाणिस्थानमधली जमीनदारी-प्रथा, धर्मांधता, स्त्री-पुरुष विषमता इ. सामूहिक वैगुण्यांबद्दल अन्वरला सच्ची चीड आहे. त्याचे वडील जरी धर्मभीरू आणि स्थानिक मशिदीचे पेशइमाम असले, तरी अन्वर इस्लामबद्दल चिकित्सक दृष्टिकोन बाळगून आहे. समतेचा घोष करणारा इस्लाम आणि समतेच्या विचाराची टवाळी करणारी जमीनदारी प्रथा एकत्र कशा नांदू शकतात, हा अन्वरला पडलेला प्रश्न आहे. म्हणूनच तो त्यांच्या युवावस्थेत कम्युनिस्ट होतो, मॉस्कोत इंजिनिअरिंगची विद्या शिकायला जातो, तिथे रशियन सौंदर्यवती तान्याच्या प्रेमात पडतो. तिच्याशी लग्न करतो आणि देशाची सेवा करण्याच्या उदात्त हेतूने अफगाणिस्थानमध्ये परतून येतो. अन्वर हा सत्ता हस्तगत करणाऱ्या सगळ्याच अफगाणी राष्ट्राध्यक्षांच्या मर्जीतला असूनही सत्तेच्या सारीपाटावर मात्र तो केवळ एक प्यादंच ठरतो. सत्तेच्या राजकारणात साधारण नागरिकाची हीच नियती असते.
 कादंबरीत अन्वरहून किंचित कमी जागा व्यापणारी व्यक्तिरेखा म्हणजे प्रो. करिमुल्ला. प्रोफेसरमहाशय इस्लामचे गाढे अभ्यासक आणि शुद्ध इस्लामचे बंदे आहेत. त्यांचे प्रकांड इस्लामिक ज्ञान कादंबरीवर एखाद्या सर्वव्यापी छायेसारखं पडलेलं आहे. गंभीर प्रवृत्तीच्या प्रोफेसरमहाशयांचा इस्लामिक विचार हा कडवा, पश्चिमविरोधी आणि कुराणाला अपरिवर्तनीय मानणारा आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या विचारांना जितकी इस्लामिक वर्तुळात मान्यता आहे, तितकीच त्यांच्या विरोधकांच्या, इन्किलाबी वर्तुळातसुद्धा.
 कादंबरी जशी अन्वर पगमानीच्या आयुष्याचा दीर्घ आलेख मांडते, तशीच ती प्रो. करिमुल्लांच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनाचासुद्धा आलेख मांडत त्यातले विरोधाभास पुढे आणते. इस्लामवर अचल निष्ठा असलेल्या प्रोफेसरमहाशयांना इस्लामचा बंदिस्त की खुला विचार प्रिय आहे, हे सुरुवातीला नीट उलगडत नाही. मात्र त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ज्या घटना घडतात, त्यावरून त्यांना उपरती होते आणि ते इस्लामचा खुला, स्त्री-पुरुष समतेचा विचार शिरोधार्य मानून, वा ध्येयाप्रत कार्य करण्यासाठी कटिबद्ध होतात. हे कादंबरीच्या शेवटी घडतं. तोपर्यंत इन्किलाबी व जिहादी विचारसरणीनं अफगाणिस्थानला स्मशानभूमी करून टाकलेलं असतं.

अन्वयार्थ □ २२१