पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कादंबरीची संवेदनशीलता


 अफगाणिस्थानच्या पुरुषसत्ताक सांस्कृतिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी अफगाणी स्त्रीच्या मनाचं पर्यावरण, तिच्या मुक्तीच्या ऊर्मी, तिचा समतेचा लढा स्त्रीवादी दृष्टिकोनातून चित्रित करते. त्यामुळे या मोठ्या कादंबरीचा तोल केवळ पुरुष-केंद्री किंवा केवळ स्त्री-केंद्री न होता तो उभयकेंद्री होतो. कादंबरीची ही जमेची बाजू. कादंबरीत भेटणाऱ्या सलमा, अनाहिता, तराना, झोरा, झैनाब, झरीना, मरुफ आणि जमिला या मनस्वी स्त्रिया या राजकीय कादंबरीला खऱ्या अर्थाने भावनांची समृद्धी देतात.
 या स्त्रियांशिवाय ही कादंबरी म्हणजे अफगाणिस्थानचा रक्तपिपासू, पण शुष्क इतिहासच ठरला असता. पुरुषांमध्ये सेक्सइतकीच सत्तेची प्रेरणा आदिम असते. या पार्श्वभूमीवर जर ही कादंबरी इन्किलाबी विरुद्ध जिहादीच्या सत्तासंघर्षाची कथा म्हणून पेश केली गेली असती, तर या सत्तापिपासू नरांच्या खेळात फक्त AK.47 चे निनादच ऐकू आले असते. नरकेंद्रित शह आणि काटशह, लष्करी बंड आणि रक्ताच्या चिळकांड्यांना कादंबरीत पुरेसा अवकाश (space) असला, तरी या राजकीय कादंबरीचा तोल राज्यशास्त्रीय किंवा शीत युद्धाच्या अतिरिक्त समालोचनाने . पूर्णपणे ढळतो असं म्हणता येणार नाही.
 याला कारण, या साऱ्या समालोचनाला अर्थ देणारे स्त्री-पात्रांचे व्यक्तिनिष्ठ भावसमृद्ध संदर्भ. ही मानवकेंद्रित व्यक्तिनिष्ठा आणि भावनाच कादंबरीचा आत्मा असते. भावनांच्या उद्रेकांतून आकार घेणाऱ्या अनपेक्षित प्रेरणा जेव्हा वाचकाला भेटतात, तेव्हा वाचकाची स्वतःशीच गाठभेट होण्याची शक्यता असते. कादंबरी वाचण्यामागे ही गाठभेटीची, आत्मज्ञानाची प्रेरणा कधी मध्यवर्ती, तर कधी काठावरची म्हणून वाचकाला नकळत सोबत देत असते. म्हणूनच वाचक कादंबरीच्या प्रमुख आणि दुय्यम पात्रांच्या आयुष्यांशी एकरूप होतो. आत्मज्ञानाशिवाय कादंबरीची इतर प्रयोजनं दुय्यम आहेत.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'मध्ये ही प्रक्रिया घडते का? घडते. ती किती जास्त किंवा किती कमी प्रमाणात हा तपशील वाचकसापेक्ष ठरतो. पण १९९९ च्या डिसेंबर महिन्यात, ज्या अफगाणी जिहादींनी भारतीय विमानाचं कंदाहारमध्ये अपहरण केलं आणि त्यातून भारतीय समूहमनाला जी ठसठसणारी अपमानस्पद वेदना दिली, त्या संशयास्पद देशाची प्रथम कम्युनिस्ट्स आणि नंतर जिहादी जी वाताहात करतात, ती वाचताना मराठी वाचक सुटकेचा नि:श्वास न टाकता कादंबरीच्या पात्रांच्या सुखदुःखांशी समांतर जाऊ लागतो, हे 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या
{{left|२२२ □ अन्वयार्थ}