पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 या ऐतिहासिक कादंबरीची कथावस्त स्थानिक, म्हणजे पेशवाई, मराठेशाही किंवा मुख्य धारेच्या इतिहासाने दुर्लक्षिलेली अशी ‘सबआलटर्न' नाही तर ती 'परदेशी' आहे. त्यामुळे सर्वसाधारण वाचकाला स्पष्ट होईल, असं विवेचन करणं लेखकाला क्रमप्राप्त झालं असावं. त्यामुळे कदाचित कादंबरीत केलेली आंतरराष्ट्रीय घडामोडीची चर्चा काही ठिकाणी पाठ्यपुस्तकांच्या वळणानं जाते. ऐतिहासिक कादंबरीची ही मजबुरी मानली, तरी हिला कवेत घेऊन देशमुखांनी कादंबरी वाचनीय केली आहे, याचं कारण त्याचं राजकीय तथ्यांचं भान उत्तम आहे.
 मात्र कादंबरी इन्किलाब-केंद्रित वाटते. कादंबरीचा दोन-तृतीयांश भाग हा कम्युनिस्टांच्या राजवटीवर खर्ची पडला आहे. जिहादला प्राणभूत असलेल्या तालिबान चळवळीचा उल्लेख, साडेनऊशे पानी कादंबरीत सुमारे अठशेव्या पानावर म्हणजे फारच उशिरा येतो. इन्किलाबी म्हणजेच कम्युनिस्ट्स, रशियन महासत्तेच्या अस्तानंतर जवळजवळ नामशेषच झाल्यात जमा आहेत. त्यामुळे या लाल महासत्तेच्या अफगाणिस्थानमधल्या प्रभावाचं विच्छेदन ऐतिहासिक असलं, तरी त्याची धार कालानुरूप बोथट झालेली वाटते.
 जिहाद मात्र धगधगीत आणि चालू काळातली एक जाचक कल्पना असल्यामुळे, ही कादंबरी जरा जिहाद-केंद्रित झाली असती, तरी चाललं असतं, कारण त्यातून कादंबरीचं दिशादर्शक मूल्य खचितच वाढलं असतं. जिहादांनी अफगाणिस्थानचा कसा सत्यानाश केला, हे इन्किलाब्यांनी केलेल्या सत्यानाशाच्या तुलनेत कमी प्रत्ययकारी रीतीनं व्यक्त झालेलं वाटतं. लेखकाचा इन्किलाबवरचा रिसर्च हा जिहादच्या रिसर्चच्या तुलनेत समग्र वाटतो. मात्र एका कादंबरीसाठी, एखाद्या विषयाचा

आठ वर्ष पाठपुरावा करणाऱ्या या लेखकाला मानाचा मुजरा केलाच पाहिजे.

पौर्वात्य विरुद्ध पाश्चात्त्य द्वंद्व


 भारतासारखाच अफगाणिस्थानसुद्धा परंपरा आणि प्रगतीच्या चक्रीवादळात सापडलेला एक देश आहे. स्वदेशी परंपरेचं ‘मागासवाणं' चेटूक सामूहिक मनावरून उतरवण्यासाठी पाश्चात्त्य विचारसरणीचा भौतिकवादी, विवेकशील झाडूच हवा, हे आशियामधल्या विकसनशील आणि अर्धविकसित देशांतल्या (मूठभर) बुद्धिवादी अभिजनांना वाटतच असतं. कादंबरीत भेटणाऱ्या ऐतिहासिक पुरुष पात्रांना म्हणजे नूरमहंमद तराकी, बबरक करमाल, अमिन, मजिबुल्ला या इन्किलाबी नेत्यांना प्रकर्षाने वाटतं, तसंच ते अनाहिता, सलमा व जमिलासारख्या ठसठशीत स्त्रीव्यक्तिरेखांनासुद्धा.

 देखणा, बुद्धिवान आणि कम्युनिझमची दीक्षा घेतलेला अफगाणी युवक,

२२० □ अन्वयार्थ