पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



आधारलेल्या कादंबऱ्या आहेत. मराठीत अशा वास्तव व कल्पनेचे मिश्रण असलेली कादंबरी प्रथमच लिहिली गेली आहे, यात शंका नाही.

इतिहास व कादंबरीचा तोल


 अफगाणिस्तानानं क्रांती आणि धर्मयुद्ध (इन्किलाब आणि जिहाद) या दोन्हींचा अनुभव घेतला. तिथं १९७८ मध्ये डाव्या विचारसरणीचं झालेलं बंड ही क्रांतीच होती. पण ती इस्लामी श्रद्धा दुखावणारी असल्यानं तिच्यातून प्रतिक्रांती म्हणजे जिहाद आला. त्यातून अमेरिकेबद्दल तीव्र द्वेष रुजवला गेला. रशिया, अमेरिका, पाकिस्तान सगळ्यांनाच तिथं पाय रोवायचा होता आणि हे महासत्तांमधील शीतशुद्ध होतं व आहे. या सर्वांचे चित्रण करताना इतिहास आणि कादंबरी यांचा तोल देशमुखांनी बऱ्याच यशस्वी प्रमाणात साधला आहे. मात्र काही ठिकाणी इतिहासाचे पारडे थोडे अधिक खाली गेलेले दिसते आणि काल्पनिक व वास्तव अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीमुळे कादंबरीचे एक स्वायत्त जग निर्माण होण्यात थोडाफार अडथळा येतो, नाही असे नाही. वाचकांचाही थोडा गोंधळ उडतो. पण एका विशाल कॅनव्हासवर इतिहास सांगत असतानाच कादंबरीतील पात्रांच्या सुखदुःखांशी तो निगडित करताना थोडेफार अडथळे व अडचणी येतातच. तरीही कादंबरी व इतिहास ही दोन सूत्रे लेखकाने आलटून पालटून एकमेकांत मिसळून व अलग करून अखेर कादंबरीचे एक देखणे शिल्प रचण्यात यश मिळविले आहे.
 सन १९५० ते १९९८ हा कालखंड या कादंबरीत येतो. झहीरशहाच्या राजवटीत जे नेतृत्व उदयाला आलं त्यात दाऊद खान, तरावी, करमाल वैगरे व्यक्तिरेखांचे वैशिष्ट्यपूर्ण चित्रण लेखकाने केले आहे. तालिबानी राजवटीत सर्वांत जास्त कुणी सोसले असेल, तर ते स्त्रियांनी. सलमा, जमिला, रशियन वंशाची तराना, अॅसिडचे डाग मांडीवर झालेली सलमा, झैनाब या सगळ्याच स्त्रिया पुरुषी अहंकाराच्या बळी आहेत. त्यातील जमीलाला तर दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा होते. कारण तिने एका ब्रिटिशाशी लग्न केले, हा तिचा गुन्हा. साम्यवाद, आधुनिकतावाद, धार्मिक मूलतत्त्ववाद यांच्या आंदोलनातून झालेले सत्तापरिवर्तन, शह-काटशह, रक्तपात यांचा हा इतिहास आहे. त्यातील अन्वर... मध्यवर्ती ठेवून लेखकाने त्याच्या भोवताली राजकारणाचा पट विणला आहे.

 प्रारंभी अमेरिकनांमुळे 'इस्लाम खतरे मे हैं' या घोषणेला फसून जे अतिरेक्यांना मदत करतात, त्यांना पुढे पश्चात्ताप होतो व यापैकी अनेकांच्या वाट्याला क्रूर हत्याकांड येते. त्यांना त्यांची चूक फार उशिरा कळून चुकते. तरुण पिढी अफू, चरस, गांजाच्या नशेत मश्गूल आहे... विद्यापीठाच्या

अन्वयार्थ □ २०७