पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



धगधगती वाटचाल

 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी गेल्या अर्धशतकातील अफगाणिस्तानच्या धगधगत्या वाटचालीची कथा आहे. साम्यवाद आणि भांडवलशाही या दोन प्रभावी विचारप्रवाहांत फरफटत गेलेल्या आणि अखेर कडव्या इस्लामी राजवटीत परिवर्तन झालेल्या त्या देशातील माणसांच्या सुखदुःखांची ही कहाणी देशमुखांनी पूर्वी उल्लेखिलेले वास्तव व राजकीय व्यक्ती आणि त्याभोवती अन्वर, त्याचं कुटुंब व त्यांचा मित्रपरिवार या काल्पनिक पात्रांच्या साह्याने सांगितली आहे. अफगणिस्तानच्या रूपानं आंतरराष्ट्रीय धार्मिक म्हणजे इस्लामी दहशतवादाचा विषय कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा आपण मराठीत प्रथमच प्रयत्न केला आहे, हे त्यांचं म्हणणं खरं आहे.
 भारतीय माणसाला अफगाण माहिती आहे, ते महाभारतातील गांधारी कंदाहारमधून आली यामुळे आणि रवींद्रनाथांच्या काबुलीवाला कथेने. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांनी भारताच्या 'आयसी ८०४' विमानचं अपहरण केलं व मौलाना अजहर मसूद याची सुटका दडपण आणून करून घेतली. ही अलीकडची घटना आहे. लक्ष्मीकांत देशमुखांनी अफगाणिस्तानमधील दोन प्रेरणा व त्यातून फोफावलेला मूलतत्त्ववाद यांचा इतिहास कादंबरीच्या माध्यमातून विस्तारानं मांडला आहे. आधी रशियातील साम्यवादी विचारधारा तराकी व इतरांनी रुजवून लष्कराच्या-विद्यार्थ्यांच्या साह्याने सशस्त्र क्रांती घडवून सत्ता मिळविली. पुढे त्याविरुद्ध मुल्ला-मौलवींचा प्रतिकार सुरू झाला. हिकमतयार रब्बानीसारख्या कट्टर पुनरुज्जीवनवादी, कर्मठ मुस्लिमांनी राष्ट्राध्यक्ष करमालविरुद्ध लढा पुकारला आणि रशियन सेनेमुळे देश गुलाम झाला, धर्म धोक्यात आला, हा प्रचार सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यांत घुसवून अधिक जहाल व अधिक प्रतिगामी सरकार सत्तेवर येऊन अफगाणिस्तानच्या जनतेला अक्षरश: बरबाद केलं. आणीबाणीच्या रोषाला बळी पडल्या त्या स्त्रिया. त्यांचं शिक्षण थांबवलं, नोकऱ्या थांबल्या; पडदा व अन्य जाचक बंधने आली आणि स्त्रियांचा श्वासच घुसमटला. याचं चित्रण देशमुखांनी अप्रतिम केलं आहे. इस्लामची एकेक बंधनं आणि त्यांनी दिलेल्या मध्ययुगातल्या क्रूर शिक्षा अंगावर काटा आणतात. शाळा, शिक्षण व खेळाविना युद्धाच्या छायेत अफगाण बालकांच्या दोन पिढ्या वाढल्या. त्यांच्या हातात पुस्तक न येता एके ४७ मशिनगन्स आल्या आणि अफगाणी माणूस, त्याची सुख - दु:खं, त्याच्या वाट्याला आलेला संघर्ष, भोग हे मध्यवर्ती सूत्र ठेवून आपण कादंबरीची रचना केल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. ही कादंबरी फॅक्शन स्वरूपाची आहे अशी एक मराठीत नवी कल्पना त्यांनी मांडली आहे. म्हणजे तिच्यात ‘फॅक्ट' आणि 'फिक्शन' यांचे कलात्मक मिश्रण आहे. इंग्रजीत ‘इन कोल्ड ब्लड' सारख्या अशा फॅक्टवर

२०६ □ अन्वयार्थ