पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



त्याची संकल्पशक्ती, त्याचे मूल्यभान आणि त्याची माणुसकी या गोष्टी सत्ता-मोहापुढे दुर्बळ ठरतात. लोकशाहीचा, मूलतत्त्वाचा बळी देऊन एकाद्या हुकूमशाहासारखी सत्ता मिळवणारा हिटलर जर्मनीच्या लोकशाहीत कसा वरचढ झाला असेल त्याचा प्रत्यय ही कादंबरी नकळत देते. त्याचप्रमाणे लोकशाहीत अराजकही कसे निर्माण होऊ शकते त्याचेही दर्शन घडते. या सर्व अंधेरनगरीत नेस्तनाबूत होतो तो सामान्य, सत्प्रवृत्त माणसू.
 अंधेरनगरीतली नगरपालिका ही एकप्रकारे देशाच्या लोकशाही प्रयोगाचा छोट्याशा पडद्यावर घेतलेला क्लोजअप आहे. जात, धर्म, राजकारणाचे तत्त्वज्ञान, समाजसेवेचे व्रत, वैयक्तिक आचरणाचा पवित्रपणा, सार्वजनिक जीवनातील समाजाशी बांधिलकी आणि मूल्यनिष्ठा, मैत्री या सर्वांचा हीनपणे कसा दुरुपयोग केला जातो याची प्रचिती हा जीवनानुभव आणून देतो. या सर्व गावगाड्यात एखादा वकीलबाबू सच्छील राहू शकतो पण तो नि:शक्त ठरतो. एखादा खरी मूल्यनिष्ठा असणारा, समाजकार्य, करण्याची इच्छा आणि काहीतरी चांगले करावे अशी आकांक्षा बाळगणारा, समर्थ, हुशार, तडफदार, आणि आत्माभिमान बाळगून जगू पाहणारा, भांगेसारखा नगरपालिका अधिकारी निवडणुकीच्या राजकारणाची वरून मोहरी हलवणाऱ्या पक्षश्रेष्ठींच्या बुलडोझरचा कसा बळी ठरतो याचे प्रभावी चित्र देशमुखांनी रेखाटले आहे.

 यात वेगवेगळ्या पक्षांची, धर्माची, जातीची, राजकीय पक्षाची माणसे येतात, पण देशमुख यांना माणसांच्या चित्रणात फारसा रस नाही आणि त्यांनी जो विषय समोर ठेवला आहे, त्यासाठी त्याची आवश्यकताही नाही. या माणसांचे ओझरते, कामापुरते, साधनस्वरूप, ढोबळ चित्रण येते. यातले वास्तव मुख्यत्वेकरून सिंधी नगराध्यक्ष लालाणी आणि नगरपालिका अधिकारी भांगे यांच्याद्वारा प्रस्तुत केले आहे. काहीसे महत्त्व जातीचे पाठबळ घेऊन नगराध्यक्ष बनू पाहणाऱ्या पाटील यांना व त्यांचे सोयरे बनू पाहणाऱ्या पवारांना आणि कादंबरीच्या उत्तरार्धात लालाणींना मात देऊ पाहणाऱ्या प्रकाशबापूंना आहे. पण यांचीही अनेक बारकाव्यांनिशी व्यक्तिचित्रे काढण्याचे प्रयत्न लेखकाने केलेले नाहीत. लालाणींचे मित्र जनता दलाचे वकील बाबू एक चांगले मित्र म्हणून आणि लालाणींना विवेकाचे भान देणारी व्यक्ती म्हणून थोडे ठळकपणे समोर येतात. भांगे यांची पत्नी यशोदा हिचेही एक समजूतदार गृहिणी या नात्याने ठळक चित्र आले आहे. यात जुने स्वातंत्र्यसैनिक पण नव्या भ्रष्ट राजकारणात एकटे पडले आहेत, सेवानिवृत्त सेनाधिकारी, समाजसेवा करू पाहणारे कणखर व जिद्दी मोडक आहेत. पण नव्या राजकारणात ते दोघेही निस्तेज होत आहेत. या सर्व माणसांपेक्षा लेखकाला मुख्यत्वे उभे

अन्वयार्थ □ १८१