पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



राजकीय सत्यस्थितीचा आविष्कार : अंधेरनगरी

चंद्रकांत बांदिवडेकर

 लक्ष्मीकांत देशमुख यांची अलीकडे (१९९४) प्रसिद्ध झालेली 'अंधेर नगरी' राजकीय कादंबऱ्यांत वैशिष्टपूर्णतेने भर टाकणारी कादंबरी आहे. देशमुखांनी नगरपालिका आणि त्यातून प्रतिबिंबित होणारे भ्रष्ट समाजकारण, त्या भ्रष्ट समाजकारणाला गती देणारे सत्तेचे राजकारण आणि सर्व देशाच्या सत्तापिपासेतून उत्पन्न होणारे हिंस्र, क्रूर, स्वार्थांध, आत्मकेंद्रित शासन या वास्तवाचा वेधक शोध घेतला आहे. एका बाजूने आपला मुख्याशय नगरपालिकेच्या राजकारणापुरता आणि प्रशासनापुरता मर्यादित करून घेतला तरी त्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या एकूण पतनशील होत चाललेल्या लोकशाहीच्या प्रणालीचा ताकदीने कलात्मक निर्देश केल्यामुळे हे वास्तव विश्लेषण सर्व देशाच्या राजकारणाचे प्रातिनिधिक ठरले आहे. वरकरणी काही ठरावीक पात्रांपुरते आणि छोट्या पैसापुरते मर्यादित हे वास्तव अनेक दिशांतून येणाऱ्या चिवट धाग्यांमुळे कसे गुंतागुतीचे व व्यापक झाले आहे ते देशमुखांनी दाखवले आहे. माणूस चांगला असतो, वाईटही असतो, तो काही प्रसंगी चांगला वाटतो, तर काही प्रसंगी चांगला वाटणारा माणूस क्रूर व वंचकही बनू शकतो. माणसाच्या स्वभावाबद्दलची ही प्रवाही व्यामिश्रता स्वीकारल्यामुळे या कादंबरीतल्या ढोबळ रेखांनी चित्रित केलेल्या पात्रांना महत्त्व आले आहे.

 ही कादंबरी वाचताना असे वाटत जाते की माणसाची मूलभूत प्रेरणा फ्रॉइड म्हणतो, तशी कामभावनेपुरती मर्यादित नसते, तर ती कामभावनेपेक्षाही अधिक मूलभूत असलेल्या अधिकार लालसेची असते. अॅडलरने आपल्या गुरूला - फ्रॉईडला - योग्य मुद्यावर विरोध केलेला आहे याची खात्री अशा कादंबऱ्या वाचताना होते. राजकीय कादंबरीमध्ये राजकारणातील विविध डावांच्या - प्रतिडावांच्या मुळाशी ही सत्तापिपासा, ही अधिकारभावना अधिराज्य करत असते आणि तिचा खेळ मोठा रहस्यमय, अतार्किक, हादरवणारा असतो. माणसाचा विवेक आणि

१८० □ अन्वयार्थ