पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



करायचे आहे ते राजकारणाचे भ्रष्टाचाराने बरबटलेले, वास्तवमूल्यांचा चुराडा करणारे स्वार्थकेंद्रित राजकारण; खालपासून वरपर्यंत या राजकारणाचे एकमेकात गुंतलेले धागेदोरे आणि ते प्रभावीपणे कादंबरीकाराने दाखवले आहेत.

 लालाणी नगराध्यक्ष झाले ते डावपेचाने. त्यांना या नगराने निर्वासित म्हणून आलेले असताना आश्रय दिला म्हणून नगरासाठी काही करण्याची त्यांची कृतज्ञतापूर्ण जिद्द. इतरांच्या रागालोभाची पर्वा न करता धडाधड काम करण्याची वृत्ती आणि यामुळे अहंकारावर आघात झालेल्या माणसांच्या इतराजीची काळजी न करता आपल्या बुद्धीच्या, कर्तृत्वाच्या आणि कार्यकुशलतेच्या बळावर नगरपालिकेचा . गाडा ओढण्याचे लालाणींचे धडाकेबाज व्यक्तित्व काहीसे नाट्यमयतेने तर पुष्कळसे वर्णनात्मक शैलीने कांदरीबकाराने चित्रित केले आहे. नगरपालिकेतील विविध गट, त्या गटांतील स्वार्थामुळे निर्माण झालेले उपगट, त्यांचे डावपेच, सत्तेसाठी, खऱ्या खोट्याचा विधिनिषेध न बाळगता चाललेली दौड, राजकारणात कायमचे शत्रू व मित्र नसतात याची खूणगाठ बांधून निर्लज्जपणे आपली खेळी खेळणाऱ्या नगरपित्यांचा खेळ, स्वार्थासाठी एकमेकांशी जमवून घेण्याचे व प्रसंगी मैत्रीचीही आहुती टाकण्याचे बेमुर्वतखोर आचरण यांचे प्रचितीपूर्ण चित्रण देशमुखांनी केले आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, राज्याचे राजकारण आणि देशाचे राजकारण यातला केवळ निवडणुकीच्या यशाचे उद्दिष्ट ठेवून चालवलेले निदर्य खेळ हे या कादंबरीचे वास्तव आहे. लालाणींनी नगराध्यक्षपद अडीच वर्षे भोगले. आता उरलेला वर्षाचा काळ ते आपण भोगावे या आणि एवढ्याच उद्देशाने प्रकाशबाबू गटबाजी करतात आणि लालाणींना पराभव पत्करायला भाग पाडतात. त्यांच्यातील परस्परांच्या डावपेचांचे विश्वसनीय चित्र हा या कादंबरीचा महत्त्वाचा भाग. त्यात लेखकाला चांगलेच यश आले आहे. शेवटी लालाणी प्रकाशबाबूंनाही अध्यक्षपद भोगता येऊ नये म्हणून त्यांच्यापाशी असलेल्या प्रकाशबाबूंच्या सही असलेल्या कोऱ्या कागदाचा उपयोग करतात. हा प्रसंग एका बाजूने काहीसा नाटकी वाटतो, पण दुसऱ्या बाजूने मूल्यनिषेध न बाळगता सज्जन माणसेही कशी खालच्या स्तरावर येऊ शकतात याचे वास्तव यात दर्शवले आहे. या सर्व घोडदौडीत मालखरे यांच्यातील समर्थ पत्रकारही मूल्यविचार गुंडाळून ठेवून लालाणींच्या विरुद्ध आघाडीत सामील होतात. बुद्धिवादी लोकांची ही घसरण चिंताजनक आहे आणि ते वास्तव नाकारणेही कठीण आहे. ही कादंबरी एक प्रश्न उभा करते - लालाणींच्या माध्यमातून मुख्यत: आणि इतरांच्या माध्यमातून गौणत: - तो प्रश्न असा - शेवटी या सत्तापिपासेतून केलेल्या डावपेचांचे फलित काय? निरर्थक धडपड. पण सत्तापिपासेचा भोग हाच मोठा सम्मोहित करणारा भाग आहे. मात्र या प्रश्नाकडे लेखकाने बोट दाखवले

१८२ □ अन्वयार्थ