पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वाचावी म्हणून तू सी. ओ.ना रोकू शकला नाहीस..... पण मला भीती वाटते ..... तूही फार काळ राहू शकणार नाहीस.... वॉच माय वर्ड. हे भाकीत चुकलं तर मित्र म्हणून मला आनंद वाटेल... पण यावेळी तू घसरलास. एक चांगला माणूस तू घालवलास. मला काळजी वाटते ती या शहराची ..... सी. ओ.नी त्या दिवशी काय म्हटलं ते आठवतं ना - जर कौन्सिलनं भावनेच्या भरात अतिक्रमणाच्या बाजूने कौल दिला तर भविष्यकाळात हे शहर म्हणजे एक प्रचंड बकाल झोपडपट्टी बनेल..... आय फियर टॅट, आय फियर टॅट - लाला....! (पृष्ठ १७७) या भाषेमधून नगरपालिकेच्या वरून दिसणाऱ्या कारभारापेक्षा या व्यवस्थेच्या अधोविश्वात चाललेले व्यवहार देशमुखांची ही भाषा पृष्ठस्तरावर आणण्याचे काम करते. राजकीय वर्तनाची ही बाजू म्हणजे भयानक वास्तव असते. तिचे नेमके आकलन वरील भाषेतून लेखक मांडतो. त्यामुळेच या कादंबरीतून समकाळातल्या एका जिवंत विषयाला लक्ष्मीकांत देशमुख न्याय देऊ शकले आहेत.
 'ऑक्टोपस' कादंबरीमध्ये शासनाच्या महसूल खात्यातील भ्रष्ट व्यवहाराचे चित्र येते. शासनव्यवस्थेतील महसूल हे एक महत्त्वाचे खाते आहे. लोककल्याणासाठी अस्तित्वात आलेले हे खाते म्हणजे भ्रष्ट व्यवहाराचे, हितसंबंधाच्या गोष्टींनी व्यापलेले एक मोठे जाळे बनले आहे. वरून महसूल खात्याचे दिसणारे एक भव्य रूप सर्वांसमोर असते. पद-प्रतिष्ठेसाठी प्रशासनाच्या पातळीवर या खात्याचे सर्वांना आकर्षण असते. परंतु या खात्यांतर्गत चाललेले गैरव्यवहार, भ्रष्टाचार सामान्यांच्या आकलनपलीकडील आहे. 'ऑक्टोपस' हे शीर्षक या व्यवहाराचे प्रतीक आहे. या खात्यांतर्गत कार्यरत असणारे जिल्हाधिकारी आनंद पाटील आणि तलाठी भगवान काकडे यांच्या माध्यमातून या खात्यातील कारभाराचा उभा छेद लेखकाने या कादंबरीत घेतला आहे.

 या कादंबरीत भगवान काकडेची व्यक्तिरेखा मध्यवर्ती असून त्याच्या जीवनात खात्यांतर्गत राजकारण, ताणतणाव, आरोप, चढउतार अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीने रेखाटले आहेत. योगायोगाच्या घटना, घडवून आणलेले काही प्रसंग पाहता ही कादंबरी सिनेमॅटिक होताना दिसते. संवादांचे स्वरूपही पटकथेतील संवादासारखे असल्याने ही कादंबरी एखाद्या चित्रपटाची कथाच वाटते. ती असे वाटण्याचे एक कारण या कादंबरीत येणारे संवाद आणि भाषा हे आहे. काही ठिकाणी आलेले संवाद रोमँटिक झाले आहेत. कादंबरीच्या प्रारंभीच “या साडीत तू फारच आकर्षक व चित्तवेधक दिसतेस!", "या फोटोत दोन देवी आहेत. एक सर्वांची माता देवी, तर दुसरी फक्त माझी एकट्याची गृहदेवी!", “येस, माय डिअर. यू आर परफेक्टली टाईट!" असे संवाद कादंबरीपेक्षा चित्रपटातील वाटतात.

१७६ □ अन्वयार्थ