पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 'ऑक्टोपस' या कादंबरीतील अवकाश उस्मानाबाद परिसरातील आहे. केवळ लेखक सांगतो म्हणून हे कथानक या परिसरात घडत आहे असे म्हणायचे. कारण नावगावाशिवाय या परिसराची भाषिक संस्कृती या कादंबरीतून आविष्कृत होताना दिसत नाही. या परिसराची भाषा या कादंबरीत कोणाच्याही तोंडी येताना दिसत नाही. ग्रामीण भागात तलाठ्याची नोकरी करणारा भगवानही “नाही, साहेब! तुमचा त्यात काय दोष? कुणाही अधिकाऱ्यांनी हेच केलं असतं. तुम्ही साऱ्यापेक्षा वेगळे आहात म्हणून आशा होती. मला कळलं साहेब की, तुम्ही मला सेवेत जाताना पुन:स्थापित करण्याचे आदेश सादर करायला पेशकार साहेबांना सांगितलं होतं, पण त्या जोशी प्रकरणामुळे आपण सही केली नाही! तुमच्यावर त्याच नीच जगतापनं घाणेरडा आरोप केला, मलाही रिइनस्टेट केलं असतं तर त्यानं जास्तच गरळ ओकलं असतं. असो. पण साहेब, आपण जोशीला न्याय दिला, पण माझ्यावर मात्र अन्याय झाला साहेब!" (पृष्ठ ३१) हा संवाद तलाठी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या भाषेतील वाटत नाही. वरील कादंबरीप्रमाणेच याही कादंबरीतील प्रथमपुरुषी निवेदन बऱ्याच प्रमाणात औपचारिक भाषेतूनच येते.
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या लेखकीय वाटचालीतील 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही अतिशय महत्त्वाची आणि उल्लेखनीय अशी कादंबरी आहे. सुमारे ९३४ पृष्ठांची ही बृहत कादंबरी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. अफगाणिस्तानच्या सुमारे पन्नास वर्षाच्या धगधगीत अवस्थेचा तटस्थपणे आणि अभ्यासपूर्ण घेतलेला वेध या कादंबरीच्या आशयसूत्रातून लेखकाने मांडला आहे. ही कादंबरी परिश्रम आणि कष्टपूर्वक लिहिली गेल्याच्या खुणा या कादंबरीत सर्वत्र पाहायला मिळतात. या कादंबरीत लेखकाने सांगितलेली अफगाणिस्तानची सुमारे पन्नास वर्षांच्या वाटचालीची कथा दोन भिन्न विचारांच्या संघर्षाने व्यापलेली आहे. ही कादंबरी म्हणजे जगातील एक महत्त्वाचा इतिहास असला तरी तो लेखनाने काही काल्पनिक पात्र - प्रसंगांच्या आधाराने कादंबरीच्या रूपात मांडला आहे. तो मांडताना कादंबरीच्या अनेक शक्यता देशमुखांनी अजमावून पाहिलेल्या आहेत.

 अफगाणिस्तानच्या दुर्बल, अगतिक आणि अविकसित परिस्थितीची ही कथा म्हणजे जागतिक राजकारणात एखाद्या देशाचा कसा बळी घेतला जातो याचा ज्वलंत इतिहास आहे. या कथेला व्यापक असे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ लाभले आहेत. त्यामुळेच ती मराठीतील एक महत्त्वपूर्ण कादंबरी ठरली आहे. या कादंबरीने आशयसूत्रासंदर्भात मराठी कादंबरीच्या कक्षा विस्तारण्याला मदत केलेली आहे. विश्राम बेडेकर, विलास सारंग आणि विश्राम गुप्ते यांनी आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी असलेली आशयसूत्रे कादंबरीतून मांडली आहेत. गुप्ते यांची 'अल

अन्वयार्थ □ १७७