पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भाषावापराचे उदाहरण आहे. वास्तविक दैनंदिन जीवनातील भाषावापर एवढा कृत्रिम आणि औपचारिक नसतो. यासंदर्भाने 'अंधेरनगरी'तील पुढील दीर्घ संवाद अभ्यासता येतील. पवारांची कन्या केतकी आणि पाटलांचे चिरंजीव आनंदराव यांचे प्रेमसंबंधातून लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेतील आनंदरावाचा हा संवाद आहे. 'पण पपा - बिलिव्ह मी - केतकीमुळे तुम्ही माझेच आहात. तुमच्यापुढे मी प्रांजळ आहे. यामध्ये माझ्या बाबांचं कसलंही राजकारण नाही. त्यांनी मला हे दूरान्वयानेही सजेस्ट केलेलं नाही. अजूनपर्यंत त्यांना कदाचित आमच्या प्रेमाचं माहीत पण नसावं. पण तुमची शंका साधार आहे. त्यांच्या मनात अजूनही शहाण्णव कुळीचा वृथा अहंकार आहे, जो मला साफ नामंजूर आहे.” “आता मी जे बोललो, ते माझ्या व केतकीच्या चर्चेतून निघालं होतं!" या संवादातील भाषा कृत्रिम आणि औपचारिक स्वरूपाचीच वाटते. त्यामुळे हे संवाद एखाद्या चित्रपटातील संवादासारखे वाटतात. तथापि लेखकाला जे सांगायचे आहे ते खूप सच्चे आहे हे नजरेआड करता येत नाही. बरबटलेल्या राजकारणाची, भ्रष्ट व्यवहाराची लेखकाला असणारी चीड त्यांच्या भाषेतून व्यक्त होत राहते. निवेदनाच्या भाषेतून व्यक्त होणारे पारदर्शी असे एक स्वच्छ आणि प्रामाणिक मन दिसते. यासंदर्भात खालील निवेदन अभ्यासता येईल. "हा सारा खर्च काही आपल्या कमाईतून देत नाही. आणि ते शक्यही नाही. दिवाळं वाजायचं तसं केलं तर! हा खर्च भरून काढण्यासाठी मुख्य स्वच्छता निरीक्षकाला ढील द्यावी लागते. तो अनधिकृत बांधकामाच्या फायली दडपण्यासाठी म्हणून किंमत वसूल करतो व हा खर्च निघतो. तसंच, जकात अधीक्षकाकडूनही सरबराई व इतर खर्चासाठी दरमहा पाच हजार रुपये वेगळे काढून ठेवावे लागतात. हा उत्पन्नातला तोटा नगरपालिकेच्या माथीच बसतो."

 "काही अपवाद वगळता सर्वच नगरसेवक व बहुसंख्य नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी दोन्ही हातांनी मिळेल तेवढं कमावताहेत.... नवीन काम मंजूर करणं म्हणजे खायची पर्वणी. या सर्वांचे प्लॉटिंगचे धंदे आहेत, न. प. च्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करणं, प्रत्येक खरेदीत कमिशन उपटणं..... प्रत्येक विभागात प्रत्येक कामात पैसा कसा खायचा याचं टेक्निक किती परिपूर्ण केलं आहे." (पृष्ठ ६६) राजकारणामध्ये बऱ्याच वेळा व्यक्तीपेक्षा प्रवृत्ती प्रबळ ठरत असते. त्यासंदर्भाने येणारी या कादंबरीतील भाषा राजकीय वर्तनाचे वास्तवदर्शी सूचन करते. “मै मजबूर था भांगे साहब.... मै आपको रोक सकता था, लेकिन रोक नही पाया ..... क्योंकी मझे इनके साथही रहना है।" ही लालाणीची अगतिकता ज्या शब्दातून व्यक्त होते; ती भाषा आणि त्यावर वकीलबाबूंच्या तोंडी येणारा संवाद राजकारणाचे आजचे वास्तव आहे. ते म्हणतात, “लाला, एकच सांगतो, आज आपली खुर्ची

अन्वयार्थ □ १७५