पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



करणार आहेत,' 'एवढंच नव्हे, तर त्यात त्यांनी प्रावीण्यही मिळवलं होतं!', 'हा शफीच्या अभ्यासाचा व काही प्रमाणात कौतुकाचा, तर काही प्रमाणात मत्सराचा विषय आहे!' अशी औपचारिक लेखनातील भाषा निवेदनात सतत येत असल्याने ती वाचकाच्या मनाची पकड घेण्यात कमी पडते. कारण ही भाषा व्यवहारभाषेपासून बरीच फारकत घेते. कादंबरी हा वाचक आणि लेखक यांच्यामध्ये चाललेला एक व्यवहार किंवा दीर्घ संवाद असतो. या व्यवहारातील नैसर्गिकता अशा औपचारिक भाषेमुळे हरवते. संवादाचा सूर टिकवून ठेवता येत नाही. परंतु या कादंबरीत राजकारणाची भाषा अतिशय प्रभावी आणि कौशल्याने वापरलेली दिसते. राजकारण गतिमान आणि अस्थिर असल्याने या कादंबरीतील घटना-प्रसंगांध्ये एक प्रकारची गतिमानता आहे. नगरपालिकेच्या संदर्भात लालाणी आणि पाटील यांच्यामध्ये चाललेला सत्तासंघर्ष आणि शहराचे प्रश्न टिपताना नेमकी भाषा या कादंबरीमध्ये येते.
 कोणत्याही भाषेतील शब्दांची अर्थपातळीवरील संदिग्धता तो शब्द प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आल्यानंतर संपते. या संदर्भाने अनेक शब्दांचे अर्थक्षेत्रांनुसार विश्लेषण करता येते. 'अंधेरनगरी' मध्येही येणारे असे काही शब्द कादंबरीच्या आशयासूत्रानुसार अशी अर्थवत्ता देतात ते पाहता येते. या कादंबरीमध्ये येणारे धोरणी, मुत्सद्दी, दुराग्रही, तहकूब, तोष, अनुमोदन, अंतस्थ हित, संधी, मंजूर, पक्ष शिस्त, अनुचित, खीळ, झुंडशाही, प्रमाद, सेय, निर्देश, टिट, शिजणे, डावे असे शब्द राजकीय आशयाच्या परिप्रेक्षात अभ्यासल्यानंतर; या शब्दांना प्राप्त होणारा राजकीय संदर्भातील अर्थ लेखकाने नेमकेपणने वापरला आहे. हे शब्द मराठी भाषिक व्यवहारात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वापरले जातात. परंतु हे शब्दच कादंबरीतील राजकीय आशय आणि समकालीन वास्तव प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अर्थवत्ता देतात.

 वरती उल्लेख केल्याप्रमाणे लक्ष्मीकांत देशमुख भाषावापरासंदर्भात कोणता प्रयोग न करता आपल्या समोरील वास्तवप्रश्नांना थेट भिडणे पसंत करतात. जे आहे ते प्रांजळपणे समोर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याने एक कलाकृती म्हणून त्यांच्या कादंबरीला आपोआपच मर्यादा येतात. कथापि, सभोवतालचे वास्तव समजून घेण्याचा त्यांचा आवाका या दोन्ही कादंबऱ्यांमधून दिसून येतो. निवेदनात येणारी प्रमाण मराठी आणि औपचारिक व्यवहाराची भाषा व्यक्तिरेखांच्या भाषेतही येण्यामागील कारण हेच आहे. या कादंबरीतील लालाणींच्या तोंडचे हिंदी भाषेतील संवादही याला अपवाद नाहीत. 'लेकिन मुझे दोस्ती और रिश्तेदारी जादा अहम लागती हैं।' यासारख्या संवादातून येणारी प्रमाण हिंदी त्यांच्या औपचारिक

१७४ □ अन्वयार्थ