पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



राष्ट्राध्यक्ष बनतो आणि अफगाणिस्तानातील अस्थिर राजवटीला सुरुवात होते. पुढे चार-पाच वर्षांसाठी नवा राष्ट्राध्यक्ष, त्यासाठी सत्तांतर (कुदेत्ते) ची स्पर्धा सुरू होते. १९७८ साली सौर राष्ट्रकांती होऊन नूर महंमद तराकी राष्ट्राध्यक्ष होतो. तराकी हा सामान्य अफगाण, शेतकरी, कष्टकरी व टोळी जीवनाचं वास्तव चित्रण करणारा संवेदनशील लेखक आहे. सोव्हिएत युनियनप्रमाणे देशात समाजवादी राज्यशासन आणण्यासाठी धडपडणारा आणि समतेची स्वप्ने पाहणारा हा नेता आहे. तराकीला 'इस्लाम'ला केंद्रवर्ती करून राजसत्ता चालविणे पटत नाही. राज्यकर्ते अफूच्या गोळीसारखा इस्लाम धर्माचा वापर करतात व जनतेला दारिद्र्यातही बंड न करता पिचत ठेवतात असे तराकीचे स्पष्ट म्हणणे आहे. मात्र तराकीला राष्ट्राध्यक्षपदाचा उपभोग फार काळासाठी घेता येत नाही. दीड-दोन वर्षांतच त्याला ठार मारून हफीजुल्ला अमीन सत्ता स्थापन करतो. तर अमीनला दूर सारून बबराक कमाल राष्ट्रध्यक्ष बनतो. १९८६ ला राष्ट्रध्यक्षपदी डॉ. नजिबुल्लाहची निवड होते. पण देशांतर्गत वाढत चाललेल्या मुजाहिदिनांच्या प्रभावामुळे, नजिबुल्लाहला भर रस्त्यावर फाशी देऊन प्रो. रब्बानी राष्ट्राध्यक्ष बनतो. १९९२ साली कम्युनिस्ट विचारसरणी बाजूला सारली जाऊन रब्बानीसारख्या कट्टर, पुनरुज्जीवनवादी कर्मठ नेत्याचं नेतृत्व पुढे येतं. जवळजवळ दोन अडीच दशकांच्या कालखंडात अफगाणिस्तानने टोकाचा रक्तरंजित संघर्ष पाहिलेला आहे. सतत संघर्ष, संहार व रक्तपातामुळे सामान्य अफगाणी माणसांची झालेली ससेहोलपट हा 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीचा मुख्य विषय आहे.

 १९३३ ते १९५३ या वीस वर्षांच्या कालखंडात दाऊदखान पंतप्रधान असताना, त्याने या काळात 'इन्फ्रास्ट्रक्चर' विकसित करण्यावर भर दिला. रस्ते, संदेशवहन, विमानतळ व वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले. बग्राम व कंदाहार हे दोन विमानतळ बांधले. सैन्याच्या आधुनिकीकरणावर भर देऊन केंद्रीय सत्ता बळकट केली होती. मात्र या काळात रशियाचा अफगाणिस्तानातील सत्ताकारणातील प्रभाव वाढत चालला. तर दुसऱ्या बाजूला इस्लाम हीच जीवनपद्धती मानणाऱ्या बहुसंख्य वर्गाला रशिया आणि रशियाचा कम्युनिझम शत्रुवत वाटत होता. अफगाणिस्तान हा टोळ्यांचा देश आहे. आजच्या काळातही तो मध्ययुगातील देशी भटकं जिणं जगत आहे. जमीन, कुरणासाठी मुलुखगिरी करणं ही त्याच्या जगण्याची मूलभूत अट आहे. हे लोक भांडखोर आहेत पण त्याहीपेक्षा बंडखोर आहेत. ते स्वतंत्र, आझादवृत्तीने आहेत. कुणाचीही गुलामी ते कदपि सहन करीत नाहीत. अशा मनोवृत्तीमुळे अफगाणी माणसाने आपल्यावर अंकुश ठेवू पाहणारी सत्ता उलटून टाकल्याने स्पष्टपणे लक्षात येते.

अन्वयार्थ □ १६१