पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीतून वास्तव, खरीखुरी पात्रे घेऊन अफगाणिस्तानचा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाचा इतिहास मांडणे एवढीच गोष्ट लेखकाने केलेली नाही. कादंबरीच्या प्रास्ताविकात लेखकाने नोंदविल्याप्रमाणे ही कादंबरी Faction स्वरूपाची आहे, ज्यात Fact आणि Fiction दोन्हीचं कलात्मक मिश्रण आहे. राजा अमानुल्ला ते मुल्ला मोहम्मद उमर या तालिबानच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांपर्यंतची खरी वास्तव पात्रं आहेत. अमेरिका व सोव्हिएत युनियनचा संघर्ष आहे. पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि इराणचा हस्तक्षेप आहे. हा सारा वास्तव इतिहास, घटना व प्रसंग आहेत. म्हणून कादंबरीत तारखा, सनावळ्या, मुलाखती व पत्रकार परिषदा आहेत. प्रमुख नेत्यांचं लौकिक दर्शन वास्तव धर्तीवर, तर वैयक्तिक जीवन कलात्मक पद्धतीनं रंगवताना ती पात्रं जिवंत करण्यासाठी सत्याला कल्पनेची ही तीन विचारधारांची प्रतिनिधित्व करणारी काल्पनिक पात्रं असून त्यांची व त्यांच्या कटुंबाची पन्नास वर्षांची कहाणी आहे.

 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीची मुख्य व्यक्तिरेखा म्हणजे या कादंबरीचा नायक अन्वर. हिंदुकुश पर्वताच्या वळचणीला वसलेल्या काबूलपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेलं पगमान हे अन्वरचं गाव. डोंगरमाथ्यावर व दरीत चिनार आणि देवनारच्या उंच देखण्या झाडांच्या गर्दीत वसलेलं. पगमानच्या जमिनीत पिकणाऱ्या सुक्या मेव्याला काबूलमध्ये फार मागणी आहे. अन्वरचे वडील पेशइमाम, त्यामुळे घरातील वातावरण धार्मिक. इस्लाम हे त्यांच्या जीविताचं पहिलं व सर्वोच्च ध्येय. रशियाच्या मॉस्को विद्यापीठात इंजिनिअरिंगचं उच्च शिक्षण घेण्यासाठी अन्वर चार वर्षांसाठी निघाला आहे. येथून या कादंबरीचे कथानक सुरू होते. काबूलच्या शाळेत शिकत असताना हाफिजुल्ल अमीन या विज्ञानाच्या शिक्षकामुळे अन्वर आधुनिक व पुरोगामी विचारसरणीकडे झुकतो. अमीन त्याला लेनिन मार्क्सची पुस्तके वाचायला देतात. सोव्हियत रशियामध्ये लेनिन-मार्क्स विचारांमुळे क्रांती घडून आली व कष्टकऱ्यांना चांगले दिवस आले. याउलट आपल्या अफगाणिस्तानात राजेशाहीमुळे देश पिचतो आहे आणि मूठभर जमीनदार, मुल्लामौलवी ऐशारामात लोळत आहेत असे विचार अन्वरच्या मनावर अमीननी बिंबवले. घरचं वातावरण कट्टर धार्मिक आणि बाहेर समाजवादी विचारांचा प्रभाव अशा कारणांमुळे अन्वरची मन:स्थिती सदैव संभ्रमित, द्विधा व्हायची. तो जसे वय वाढत जाईल तसा दिवसेंदिवस अंतर्मुख व गंभीर होत गेला. अन्वरचा एक थोरला बंधू हैदर राजकीय चळवळीत सक्रीय राहिल्याने तुरुंगवास भोगून तो कुठेतरी परागंदा झाला होता. तर आणखीन एक भाऊ सईद हा मात्र धार्मिक वृत्तीचा व शेती व्यवसाय बघणारा असा आहे. अन्वरवर त्याची बालपणीची सवंगडी झैनब

१६२ □ अन्वयार्थ