पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रक्तपात आणि खूनखराबा झाला नाही. सारा अफगाण देश त्यात असाहाय्यपणे भरडत गेला. खास करून स्त्रियांना अपरिमित अत्याचारांना दोन्ही बाजूंनी बळी पडावं लागलं. अफगाणी मुलांच्या हातात शिक्षण सोडून बंदुका देण्यात आल्या. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील अफगाणिस्तानचा हा इतिहास आणि त्यामागचं आंतरराष्ट्रीय शीतयुद्ध, पाश्चात्त्यांची साम्यवादविरोधी आघाडी आणि पेट्रोलडॉलर्समुळे संपन्न झालेल्या अरब देशांतून सुरू झालेली इस्लामी पुनरुज्जीवनवादाची चळवळ; त्यामुळे सतत संघर्ष, संहार आणि रक्तपात, सामान्य अफगाणी माणसाची झालेली ससेहोलपट हा या कादंबरीचा मुख्य विषय आहे. आपण मूलत: ललित लेखक असल्यामुळे कादंबरीच्या माध्यमातून आम अफगाणी माणूस, त्याची सुखदुखं: आणि त्याच्या वाट्याला या संघर्षापुढे आलेला भोग हे मध्यवर्ती सूत्र ठेवून चित्रणाचा प्रयत्न केल्याचे प्रस्तुत लेखकाने प्रास्ताविकात मत नोंदवले आहे.

 अफगाणिस्तान हा बंडखोर टोळ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशाचा बहुतेक भाग डोंगराळ असून शेतीयोग्य जमीन अवघी वीस टक्केच आहे. त्यात थंडीच्या दिवसात जीवघेणी बर्फवृष्टीही होते. अफगाणी माणूस हा खोल सश्रद्ध, धार्मिक आहे व इस्लाम हा त्याचा जगण्याचा धर्म आहे. टोळ्या करून जगणाऱ्या अफगाणिस्तानात शिक्षणाविषयी फारशी आस्था नाही. काबूल या ठिकाणी जगप्रसिद्ध असे भव्य विद्यापीठ आहे. अफगाणिस्तानला सोव्हियत रशिया, चीन, इराण, पाकिस्तान व भारत अशा भिन्न भिन्न देशांच्या सीमारेषा लाभल्या आहेत. या देशांत साम्यवादी, राजेशाही, लष्करशाही, प्रजासत्ताक अशा राजवटींचा प्रभाव. साहजिकच अफगाणिस्तानमधील राजवटीवरही या गोष्टींचा प्रभाव आहेच. अफगाणिस्तानने अमानुल्लाच्या नेतृत्वाखाली तिसरे अँग्लो अफगाण युद्ध लढून आपलं राजकीय व परराष्ट्र धोरण ठरवण्याचं साम्राज्य मिळविलं होतं. ब्रिटनचं नामधारी मांडलिकत्व झुगारून दिलं होतं. राजा अमानुल्लाने सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मुलींच्यासाठी शाळा सुरू करणे, गुलामी व वेठबिगारी कायद्याने बंद करणे, स्त्रियांना बुरख्याची सक्ती करता कामा नये असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्याने घेतले होते. विशेष करून ज्या हाजरा जमातीला राजद्रोहाची शिक्षा म्हणून कायमचं गुलामीत ठेवलं होतं, त्यांची गुलामी नष्ट करून तेही या देशाचे ताजिक पठाणांप्रमाणे समान अधिकार असलेले नागरिक आहेत असं त्यानेच ठासून सांगितलं. आपल्या दहा-बारा वर्षांच्या कारकिर्दीत अमानुल्लाला आधुनिक विचार रुजविण्यात बऱ्यापैकी यश येत होतं. पण १९२९ साली सत्तेवरून पायउतार व्हावं लागतं आणि पुढे जहीरशहा दीर्घकाळासाठी राजा बनतो. १९७३ साली अफगाणिस्तानातील त्याची सत्ता संपुष्टात येऊन दाऊदखान हा

१६० □ अन्वयार्थ