पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सत्ताकारण व समाजहित यांच्यातील द्वैत

डॉ. अशोक चौसाळकर

मराठी साहित्याचा सर्वच क्षेत्रात चांगल्या प्रकारे विकास व्हावयाचा असेल तर त्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी दान केले पाहिजे; कारण या व्यक्ती जीवनाच्या विविध क्षेत्रात काम करतात व त्या क्षेत्रातील जीवनाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव असतो. साहित्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातून हे जीवन- अनुभव आपल्या विविध रसरंगासह, त्यातील अनोख्या अनुभवासह प्रकट व्हावेत अशी प्रा. श्री. म. माटे यांची इच्छा होती व 'भाषाभिवृद्धीची साधने' या आपल्या गाजलेल्या लेखात त्यांनी आपले हे विचार व्यक्त केले होते. ललित वाङ्मयाच्या कथा आणि कादंबरी या विभागात हे अनुभव जास्त अस्सलपणे व विस्ताराने मांडता येतात व गेल्या काही अशा प्रकारचे साहित्य मराठी भाषेमध्ये लिहिले जात आहे आणि जसजसा शिक्षणाचा प्रसार समाजातील उपेक्षित व ?? होत जाईल तसतसे हे प्रमाण वाढेल.
 परदेशात राहणारे मराठी भाषिक आता साता समुद्रापलीकडच्या मराठी जीवनाची असवंश आपल्यापुढे आणीत आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय सेवेत काम करणारे अधिकारी पण आता मोठ्या प्रमाणात लिहीत आहेत. भारत सासणे, विश्वास पाटील ही त्यातील काही नावे. त्यांच्याबरोबरच लक्ष्मीकांत देशमुख यांचे नाव आपणास घेता येईल. कारण गेल्या वीस-पंचवीस वर्षांत देशमुखांनी कथा आणि कादंबरी वाङ्मयात मोठ्या प्रमाणात भर घातली आहे. देशमुखांच्या लेखन-वैशिष्ट्यांचा अभ्यास प्रस्तुत लेखात त्यांच्या 'अंधेर नगरी' कादंबरीच्या प्रस्तावनेत केला आहे.

 त्यांची 'अंधेर नगरी' ही कादंबरी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जे राजकारण चालते त्याचे भेदक विवेचन करणारी कादंबरी आहे. ही कादंबरी १९९५ साली प्रत्यक्ष प्रकाशित झाली आणि त्यानंतर १९९९ साली तिची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. या जवळ जवळ २२५ पृष्ठे असणाऱ्या कादंबरीमध्ये मराठवाड्यातील नांदेड शहरात १९८८ ते १९९६ या काळात चाललेल्या नगरपालिकेच्या राजकारणाचे,

१४८ □ अन्वयार्थ