पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आहे. प्रशासकीय भाषेची संदर्भबहुलता हा देशमुखांच्या कादंबऱ्यांचा खास विशेष आहे. मुस्लीम-हिंदू परंपरांनी आणि प्रशासकीय संदर्भानी बहुश्रुत बनलेली त्यांची भाषा उघड्यावाघड्या आणि स्पष्ट संवादाने संपृक्त बनत जाताना दिसते. आवश्यक तेथे, आवश्यक तेवढी भाषिक स्पष्टता लक्ष्मीकांत देशुखांनी बाळगली आहे. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांचे निवेदन परिणामकारक बनते. अनावश्यक निवेदनाला फाटा दिल्यामुळे व मोजके संवाद असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्या वाचनीय बनत जातात.
 वेगवेगळ्या आशयसूत्रांना प्रशासकीय भूमिकेतून हाताळल्यामुळे देशमुखांच्या कादंबऱ्या वेगळेपणा घेऊन अवतरतात आणि म्हणून त्या लक्षात राहतात. एकूण मराठी कादंबरीमध्ये आशयसूत्रांचे प्रशासकीय दृष्टीतून चित्रण फार कमी आहे. ती तूट भरून काढण्याचे काम ही कादंबरी करताना दिसते. लक्ष्मीकांत देशमुखांची कादंबरी कोणते विधान करू पाहते असा प्रश्न जेव्हा आपण उपस्थित करू, तेव्हा आपल्या लक्षात येते की, प्रशासनाने लोकाभिमुख होऊन लोकशाहीचे बळकटीकरण केले आणि रांगेतल्या शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवले तर भारताचे चित्र वेगळे असेल. अर्थात हे जे विधान आहे ते केवळ आदर्शवादी नाही. त्या विधानासाठी त्यांनी आपल्या पाच कादंबऱ्यांमधून जी तीव्र संवेदनने मांडामांड केली आहे आणि त्या मांडणीतून भ्रष्ट व्यवस्थेवर जो प्रकाश टाकला आहे, त्या प्रकाशातूनच आपणाला त्यांच्या या विधानाची रेषा स्पष्ट दिसते. ही रेषा अधिक ठळक करण्याचे काम त्यांच्या 'हरवलेले बालपण' या कादंबरीने केले आहे, आणि या कादंबरीने त्यांच्यातल्या कादंबरीकाराची वाढही सूचित केली आहे. हे त्यांचे वेगळेपण येथे नोंदवायलाच आहे.


टीप : मॅनेजर पांडेय : कादंबरी आणि लोकशाही : अनुवाद - रंगनाथ पठारे, लोकवाङ्मय मुंबई. प्रथम आवृत्ती २०११

अन्वयार्थ □ १४७