पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्त्रीभ्रूण हत्येविरोधातील चळवळ आणि देशमुख यांची


कथा


मेघा पानसरे


 श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या कथासंग्रहाच्या केंद्रस्थानी स्त्रीभ्रूण हत्येच्या भीषण सामाजिक समस्येचे चित्रण आहे. स्त्रीभ्रूण हत्या या विषयसूत्रावरील कथांत त्यांनी विशेषत: कोल्हापूर परिसरातील मध्यमवर्गीय कुटुंबांची मानसिकता ठळकपणे मांडली आहे.
 स्त्रीभ्रूण हत्येची प्रथा भारतीय समाजासाठी नवी नाही. या पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्रीला प्रदीर्घ कालापासून दुय्यम स्थान आहे. स्त्रीला सर्वच स्तरांवर लिंगभेदाचा सामना करावा लागतो. जन्म व मृत्यू दरातील असमानता, आत्मविकासासाठी मूलभूत सुविधांची - विशेषत: शिक्षणाच्या संधीची - असमानता, रोजगार व व्यावसायिक क्षेत्रात असमानता, मालमत्ता मालकी हक्काची असमानता, कुटुंबसंस्थेतील विषमता अशा अनेक बाबींत लिंगभेद दृष्य वा अदृष्य स्तरावर अस्तित्वात आहे.
 स्त्रिया या मूलत:च अगदी आदिम कालापासून कमकुवत, पुरुषावलंबी व दुय्यम दर्जाच्या मनुष्य प्राणी आहेत, असा समज सर्वसामान्यपणे समाजमानसात रुजला आहे. परंतु वास्तवात मानवी सभ्यतेच्या प्राथमिक अवस्थेत मातृसत्ताक व्यवस्था प्रचलित होती. त्या काळात माणसाची ओळख त्याच्या मातेपासून, एका स्त्रीपासून असे. स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने शिकार करत, अन्न मिळवत, टोळीच्या सदस्यांसाठी त्याची वाटणी करत, शिवाय मुक्त लैंगिक संबंधांतून मुलांना जन्म देत, त्यांना वाढवत आणि वंशसातत्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत. काळाच्या ओघात शेतीचा शोधही स्त्रीनंच लावला, असं समाजविज्ञान सांगते. त्यानंतरच्या मानवी समाजविकासाच्या टप्यात खाजगी मालमत्तेचा उगम, विवाह संस्थेचा उदय, पितृसत्ताक समाजाची घडण, त्यास मिळालेला धर्मसंस्थेचा आधार, आणि भारताच्या संदर्भात जातिसंस्थेचा उदय, परिणामी स्त्रीचं सामाजिक उत्पादनातून कुटुंबात - घरात बंदिस्त होणं आणि हजारो वर्षे मानसिक गुलामीत राहाणं, हा
१३२ अन्वयार्थ