पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इतिहास सांगितला जात नाही; शालेय व उच्च अभ्यासक्रमांतून सकसपणे, प्राधान्यानं शिकवला जात नाही. त्यामुळंच निसर्गानं केलेली स्त्री-पुरुष ही परस्परपूरक निर्मिती उच्च-नीच व श्रेष्ठ-कनिष्ठ अशा सांस्कृतिक व सामाजिक उतरंडीमध्ये एका शोषक व्यवस्थेच्या दलदलीत अडकली आहे. याच्याच परिणामी असंख्य स्त्रिया आज २१व्या शतकातही दुय्यम, शोषितांचं जिणं जगत आहेत. त्यांचं स्थान उंचावून त्यांना समाजात पुरुषांइतकाच समान दर्जा मिळावा, त्यांना समान मानवी अधिकार मिळावेत यासाठी त्या सातत्यानं संघर्ष करत आल्या आहेत. त्यांच्या रोमांचकारी संघर्षाचा इतिहास अर्थातच फारसा ज्ञात नाही. कारण मानवी समाजाचा हा इतिहास पितृसत्ताक दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे. असो.

 हजारो वर्षे स्त्री-पुरुष विषमतेच्या पायावर चालत आलेल्या या समाजात आज स्त्रीच्या अस्तित्वालाच गंभीर धोका निर्माण झाला आहे. २००१ च्या जनगणनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ०-६ वयोगटातील दर १००० मुलांमागे मुलीचं प्रमाण ९३१ (१९९१) वरून ८३९ इतकं कमी झाल्याचं निष्पन्न झालं, आणि अनेक संवेदनशील घटक, स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्या कमालीचे चिंतित झाले. राज्यात १९९१ च्या तुलनेत मुलींच्या प्रमाणात १०० पेक्षा जास्त घट झालेले नऊ तालुके होते. त्यात पन्हाळा, कागल, राधानगरी व करवीर हे चार तालुके कोल्हापूर जिल्ह्यातील होते. १९८० नंतर विज्ञान व तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली. आधुनिक वैद्यक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं प्रसूतिपूर्व लिंगनिदान करून स्त्रीगर्भ असल्यास गर्भपात करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं. खरं तर 'माझ्या शरीरावर माझा हक्क' ही घोषणा स्त्रीवादी चळवळीने ठळकपणे समाजासमोर मांडली आहे. परंतु तरीही संतती नियमन, गर्भधारणा, गर्भपात वा अपत्याचा जन्म इत्यादी पुनरुत्पादनाशी संबंधित बाबींत स्त्रीशरीर विविध सांस्कृतिक बंधनात अडकलेलं आहे. 'मुलगी नको, मुलगा हवा' ही मानसिकता स्त्रीचा मातृत्वाचा नैसर्गिक हक्कही नाकारते. मुलीस जन्म देणाऱ्या मातेला मुलाच्या मातेपेक्षा समाजात, कुटुंबात कनिष्ठ दर्जा आहे. तिला धार्मिक, कौटुंबिक सण व उत्सवात दुय्यम स्थान आहे. दोन वा जास्त मुली असणाऱ्या मातेस कुटुंबात हीन वागणूक मिळते. मुलगा होण्याच्या अपेक्षेत तिच्यावर कित्येक वेळा गर्भधारणा, गर्भपात वा बाळंतपण लादलं जातं. परिणामी अनेक स्त्रिया स्वत:च स्त्रीलिंगी भ्रूणाच्या निदानानं वा मुलीच्या जन्मानं दुःखी होतात. अनेक जणी निखळ मातृत्व अनुभवण्याचा, मुलगी होण्याचा आनंदही व्यक्त करू शकत नाहीत. कोल्हापूरात मातेनं स्वत:च्या नवजात मुलीची हत्या केल्याची उदाहरणं आहेत. अशा स्त्रीसंबंधी ‘अतिशय क्रूर जन्मदात्री' असे उल्लेख बातम्यांत प्रसिद्ध झाले होते. परंतु प्रत्यक्षात स्वत: जन्म दिलेल्या निष्पाप जीवास

अन्वयार्थ १३३