पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उरलेल्या नाहीत.
 त्यामळे श्री. देशमुखांच्या कथेमध्ये नव्या अपत्याच्या जन्माच्या कथानकात भावंडांचाही सहभाग आहे. कधी तो सरळ, निरागस तर कधी मोठ्यांच्या राजकरणातील प्यादे म्हणून, तर कधी प्रत्यक्ष आणि पाठ्यपुस्तकातील मजकूर यातील अंतरामुळे गोंधळलेल्या मनाचा आहे.
 प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे लेखक पतीकडे खलनायक म्हणून पाहात नाही. उदा. 'माधुरी व मधुबाला' मधील पती संवेदनाक्षम, स्त्रीविषयक सहानुभूती बाळगणारा आहे. पण त्याचे विवेकी मन 'मुलगा हवा' या संस्काराला शरण जाते. आपली चूक उमगल्यावर तो अनाथ आश्रमातील बालिकेला आपल्या पत्नीच्या कुशीत ठेवतो आणि पुढच्या वेळी मधुबाला सारखी गोड लेक हवी असेही सांगतो.
 पण सारी नाती इतकी सरळ नसतात. 'इमोशनल अत्याचार' या कथेत आपल्या पत्नीवर प्रभाव टाकण्यासाठी आपल्या जुळ्या मुलींचा वापर करणारा नवरा आहे. या कथेत एकत्र कुटुंबाचे वंशाच्या दिव्यासाठी असणारे दडपणही वापरले आहे. काही कथांमध्ये डॉक्टरी व्यवसायाचे क्रूर धंद्यामध्ये होणारे रूपांतर आहे. पाडलेल्या भ्रूणाचे पुरावे नष्ट करण्यासाठी क्रूर कुत्र्यांचा केलेला उपयोग 'लंगडा बाळकृष्ण' डॉ. अरुण लिमये यांनी सत्तरीच्या दशकात वैद्यकीय व्यवसायाविषयी 'क्लोरोफॉर्म' मध्ये केलेल्या लेखनाचे स्मरण करून देते. डॉक्टरांच्या गच्चीवरील गुलाब विशेष का तरारतात असा सूचक प्रश्नही त्यावेळी वादळी वाटला होता.
 आदर्शवादी गुरुजी आणि त्यांचा धंदेवाईक मुलगा ही इतरत्र कथा - वाङ्मयात भेटणारी पात्रेही या संग्रहात भेटतात. 'पोलिटिकल हेअर' सारख्या कथेत वंशाचा दिवा ही कल्पना इतर क्षेत्रात कशी पसरते याविषयीची व्यथा आहे. तरुण वा पौगंडावस्थेतील मुले पालकांकडे सूक्ष्मपणे पाहात असतात याची जाणीव आहे.
 कथासंग्रह प्रत्यक्ष अनुभवावर रोवलेला असला तरी कथात 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमाचा वा जिल्हाधिकाऱ्यांचा उल्लेख असावा का? असा प्रश्न उपस्थित होतो. 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमासाठी आणि त्या उपक्रमाचाच ललित दस्तऐवज असणाऱ्या कथांसाठी मराठी वाचक देशमुखांचे आभार मानतील. महत्त्वाच्या विषयावरच्या या पुस्तकाचे परिशिष्टही प्रस्तुत आणि वाचनीय आहे.

 मनोविकास प्रकाशनाने सामाजिक महत्त्वाच्या विषयावरचे आणखी एक पुस्तक आपल्याला दिले आहे.

अन्वयार्थ १३१