पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातही आलेली माहिती नजरेआड करून मुली होतात म्हणून बायकोला टाकून देणे, घरात तिचा छळ करणे चालूच होते. मुलगा न होणे यामधली पुरुषाची जबाबदारी झटकून स्त्रियांना परत परत गर्भपात करायला लावून तिच्या शरीराची नासाडी चालूच राहिली.
 कोणत्याही सामाजिक कुप्रथेला जेव्हा लोकमानसातील पूर्वग्रह कारणीभूत असतात, तेव्हा केवळ प्रबोधन वा कागदावरचा कायदा पुरेसा ठरत नाही. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तो प्रत्यक्षात उतरवायला प्रशासकीय इच्छाशक्ती आणि नियोजन लागते. अशीच इच्छाशक्ती दाखवून श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी कोल्हापूरला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर 'सेव्ह द बेबीगर्ल' हा उपक्रम राबविला. या उपक्रमात माहिती तंत्रज्ञानाचा, उपलब्ध असणाऱ्या स्वयंसेवी संघटनांचा आणि काही प्रामाणिक डॉक्टरांचा सहभाग होता. या साऱ्यांचा कृतज्ञापूर्वक उल्लेख पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत आहे. लेखकाच्या मनोगतात या प्रकल्पाविषयी माहिती असल्याने त्याचा अधिक उल्लेख करीत नाही. पण या संग्रहातील कथा कोल्हापूरच्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर घडतात, याचे महत्त्व वाचकांच्या लक्षात आणून देऊ इच्छिते. स्त्रीभ्रूणहत्येचा विचार करताना हे सारे अल्पशिक्षित दरिद्री समाजात घडत असेल असा एक समज असतो. वस्तुस्थिती वेगळे चित्र पुढे आणते. सधन आणि सुशिक्षित समाजात बालिकांचा जन्मदर घटतो आहे, हे वास्तव लक्षात घेता कोल्हापूरची पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते.
 वाचकांनी या समस्येवर विचार करावा असे श्री. लक्ष्मीकांत देशमुखांना वाटते म्हणून कथांसोबत परिशिष्टात महत्त्वाचे लेखही जोडलेले आहेत. म्हणून हे पुस्तक एकाच वेळी ललित, ललितेतर आहे असे लेखक म्हणतो.
 सामाजिक समस्या गाभा असणाऱ्या कथा लिहिताना पात्र निर्मितीविषयी विशेष काळजी घ्यावी लागते. पात्रे एकाच बाजूला लेखकाचे मुखमंत्र होऊ नयेत । पण दुसऱ्या बाजूला समस्येच्या दृष्टिकोनातून खलही होऊ नयेत ही काळजी घ्यावी लागते. प्रस्तुत कथासंग्रहातील अपत्य जन्माचे सूत्र असे आहे की, त्यात अपोआप दोन जीवांच्या - पती पत्नी नात्याचे सूत्र गुंतलेले आहे. समस्या सामाजिक असली तरी ती अवतरते कुटुंबात. पती-पत्नी नात्याचा विचारही केवळ दोन व्यक्तींमधील नाते म्हणून करता येत नाही. कारण नकळत हे नातेही सामाजिक संस्काराने घडत असते.
 नव्या अपत्याचा जन्म ही घटना ही कुटुंबाच्या अनेक अपेक्षांनी गुंतागुंतीची होत असते. आजच्या काळात कुटुंब जगते - वाढते. तो अवकाश छोटा असल्याने, पूर्वी लहान मुलांचे विषय आणि मोठ्यांचे - अशा ज्या भिंती होत्या त्याही फारशा
१३० अन्वयार्थ