पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लावले. त्यातून शिवछत्रपती क्रीडानगरी उभा राहिली. या साऱ्या प्रवासात खेळाडूंचे जीवन देशमुखांना अधिक जवळून पाहता आले असेल. त्यातून त्यांना या प्रकाराच्या कथालेखनासाठी प्रेरणाही मिळाली असेल. त्यामुळे या लेखनाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. आयुष्यात काही अनुभव चिमटीने प्यायचे असतात, तर काही ओंजळीने. स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या आयुष्यातील अनुभवाचा एखादा छोटासा तुकडाही सर्जनशील साहित्यकारासाठी पुरेसा असतो. त्याच्याच बळावर तो सर्जनाचे बांधकाम करीत असतो. अमूर्ताला मूर्त रूप देणे हे कठीणच काम, पण जे मूर्तरूपात आहे ते तसेच तसे साकार करणे हेही तितकेच आव्हानात्मक असते. कल्पिताइतकेच सत्याचे कलात्मक दर्शन घडविणे हे जास्त आव्हानात्मक असते. त्यामुळे त्या प्रकारचे अनुभवविश्व देशमुखांच्या वाट्याला आले म्हणून त्यांनी या वेगळ्या कथा लिहिल्या असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. मराठी वाचकाला अपरिचित असणाऱ्या एका नव्या प्रांतातून भ्रमंती घडवून आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. मराठीत या प्रकारचे कथालेखन दुर्मीळ आहे. या विषयाला वाहिलेला हा मराठीतला बहुधा पहिलाच कथासंग्रह असावा. खेळाडूंनी लिहिलेल्या चरित्रातून त्यांना समजून घेण्याचा प्रमाण करणाऱ्या मराठी वाचकांना खेळाडूंच्या अनोख्या जीवनविश्वाची सफर लक्ष्मीकांत देशमुख यांनी या कथासंग्रहातून घडवली आहे.
 या कथासंग्रहात एकूण दहा कथा आहेत. प्रत्येक कथा वेगळी आहे. प्रत्येक कथेतला खेळ वेगळा आहे. त्या खेळाडूंच्या वाट्याला आलेला आयुष्याचा खेळ निराळाच आहे. त्यांना खेळवणाऱ्या माणसांची एक अजब दुनिया आहे. ती या कथांमधून प्रतिबिंबित झालेली आहे. वयाच्या पलीकडे असलेल्या खेळाडूंच्या जीवनाचे दर्शन घडविण्याबरोबरच देशमुखांनी या कथांमधून आपल्या क्रीडासंस्थांचेही दर्शन घडविले आहे, ते चिंता आणि चिंतन करायला लावणारे आहे.
 'फिरूनी नवी जन्मेन मी' या कथेत एका पाथरवटाच्या पोटी जन्माला आलेल्या धावपटू मुलीची शोकांतिका आहे. आपल्या अंगभूत गुणांच्या बळावर ही मुलगी आपला ठसा उमटविते. तिच्या स्त्रीत्वाविषयी संशय घेण्याचे गलिच्छ राजकारण खेळून तिला आयुष्यातून उठवण्याचा डाव रचला जातो. नैराश्य भावनेतून ही मुलगी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न करते. तिच्यावरील बालंट दूर करण्याच्या सगळ्या वाटा बंद झालेल्या असताना वैद्यकीय आणि कायदेशीर गोष्टींचा आधार घेत तिचे हितचिंतक तिला आरोपमुक्त व जगण्याची नवी उमेद देतात. या कथेसाठी वापरलेले वैद्यकीय आणि कायदेशीर तपशील वाचल्यानंतर देशमुखांनी सर्व बाबींचा किती सूक्ष्म अभ्यास केला आहे हे जाणवते. 'शार्प शूटर' ही कथा





अन्वयार्थ १२५