पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राहतात. त्या खेळाडूंकडून सतत उत्तम कामगिरीची अपेक्षा केली जाते. ती पूर्ण झाली नाही की मग त्यांना लोकक्षोभावर सामोरे जावे लागते. खेळाडूंचे प्रातिभ आणि व्यावहारिक आयुष्य चारचौघांसारखे कधीच नसते. ते अधिक व्यामिश्र असते. खेळात जय - पराजयाची मालिका अखंड सुरू असते. हातात आलेले यश चकवा देत डोळ्यासमोरून दूर जाते. आशा - निराशेचा खेळ मनात अखंड सुरू असतो. त्या खेळात मनातले सकारात्मकतेचे आणि इच्छाशक्तीचे दिवे शांत होणार नाहीत, मालवणार नाहीत याची काळजी घ्यायची असते. एकाग्रतेने खेळ करायचा असतो. तो करीत असताना व्यावहारिक आयुष्यातले ताणतणाव बाजूला ठेवायचे असतात. त्याचे मळभ मनावर दाटून येणार नाही याची दक्षता घ्यायची असते. जिव्हारी लागणारा पराभव झाला तर त्यातून चटकन बाहेर पडून नव्या सामन्यासाठी सदैव सज्ज राहावे लागते. खेळ सांघिक असो अथवा वैयक्तिक, जिथं माणसे असतात तिथे राजकारण येतेच. कलावंत, विचारवंत आणि क्रीडापटू यांच्यातले राजकारण अधिक कुटिल असते. राजकारणी लोकांनी-देखील आश्चर्यचकित, मुग्ध व्हावे असे अनेकदा या राजकारणाचे पदर असतात. शह-काटशहाच्या अनोख्या त हा असतात. त्या समजून घेत स्वत:चा बचाव करीत वाटचाल करायची असते. त्याचे ताण मनावर येत असतात. या साऱ्या संघर्षातच मोठी शक्ती जात असते. तरीही सर्जनाची कास न सोडता आपले कौशल्य पणाला लावून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करायचे असते. यशश्री खेचून आणायची असते. ती टिकवायची असते आणि पचवायचीही असते. या साऱ्यातून तावून सुलाखून निघताना त्या खेळाडूमध्ये एक माणूसही असतो, त्यालाही इतरांच्यासारख्या भावभावना असतात. त्याच्याही जीवनाकडून आणि सहवासात आलेल्या माणसांकडून काही अपेक्षा असतात. त्यालाही मन मोकळे करायचे असते. त्या साऱ्यांचा अनेकदा त्यांच्या चाहत्यांना, मित्रांना आणि नातेवाईकांनीही विसर पडण्याचा मोठा संभव असतो. 'खेळाडूंना माणूस म्हणून समजून घेण्यात आपण अनेकदा कमी पडतो. कारण त्यांचा परफॉर्मन्स हाच आपला त्यांचे मूल्यमापन करण्याचा एकमेव निकष असतो.' खेळ, यशापयश, परफॉर्मन्स यांच्यापलीकडे असलेल्या खेळाडूंच्या जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण 'नंबर वन' या कथासंग्रहात लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे.
 नोकरीचा भाग म्हणून भारतीय प्रशासन सेवेत आय. ए. एसमध्ये काम करताना संचालक, क्रीडा व युवक सेवा म्हणून तिसऱ्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ती त्यांनी समर्थपणे पेलली. अंतरराष्ट्रीय दर्जाच्या नऊ खेळांच्या क्रीडा सुविधा, स्टेडिअम, प्ले ग्राऊंड आणि हॉल बांधायचे काम त्याच्याकडे होते. त्यांनी आपले प्रशासनीय आणि व्यवस्थापकीय कौशल्य पणाला




१२४ अन्वयार्थ