पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एखाद्या रहस्यकथेसारखी वाचकांना गुंतवून ठेवणारी आहे. वाल्याचा वाल्मिकी होणे हा शब्दप्रयोग आपल्याकडे रूढ आहे. गुन्हेगारी टोळीत शार्प शूटरची भूमिका बजावणाऱ्या एका तरुणाचे आयुष्य एका संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याचा जागरूक आणि व्यापक मनोवृत्तीमुळे कसे बदलते, शार्प शूटरचे एका उत्तम आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नेमबाजात कसे अवस्थांतर होते याची कहाणी वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात. स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी प्रथम ती पहावी लागतात. स्वप्न वास्तवात अवतरण्याचे भाग्ययोग ते पाहणाऱ्याच्या वाट्याला कसे येतात हे हळुवारपणे 'जादूचा टी-शर्ट' कथेतून देशमुखांनी उलगडून दाखविले आहे. 'प्रयासे जिंकी मना' या कथेत असणाऱ्या आई-मुलाच्या हळव्या नात्याचा विलक्षण गोफ आहे. दोघेही जलतरणपटू आहेत. जलतरणातले चापल्य मुलाकडे आईचा वारसा म्हणून आलेले आहे. पण आईला याची कल्पना नाही. ती मुलाला पाण्यापासून दूर ठेवते. याची कारणं भावनिक आहेत. मानसिक आहेत. तरीही मुलाची पाण्याविषयीची ओढ कमी होत नाही. आई, मुलगा आणि पाणी यांच्यातल्या भावसंबंधावर प्रकाश टाकणारी ही खूप वेगळी कथा आहे. 'अखेरचं षटक' या कथेत प्रेमाचा त्रिकोण आहे. दोन क्रिकेटपटूंच्या जीवनात आलेल्या एकाच प्रेयसीची आणि त्यांच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. परस्परांविरुद्ध खेळणाऱ्या दोन देशांमल्या संघातून तिचे प्रियकर खेळत असतात. सामना रोमहर्षक स्थितीतून जात असताना तिच्या मनात उमटलेल्या भावकल्लोळांचे सुरेख दर्शन या कथेतून घडते. 'रन बेबी रन' ही गुरुशिष्यांच्या भावनिक नात्याची गोष्ट आहे. एका धावपटूला आपल्या गुरूविषयी वाटणारे आकर्षण आणि त्यातून तिच्या जीवनात निर्माण झालेले गुंते ही कथा उलगडून दाखवते. ती धावपटू नवऱ्याच्या मानसिक आणि शारीरिक माणसाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. तिच्या डायरीतून तिच्या करुण आयुष्याची पानं उलगडत जातात. धावण्याच्या शर्यतीत जिंकणारी ती आयुष्याच्या स्पर्धेत आणि जगण्याच्या कोलाहतात कशी थिजत जाते, पराभूत होत राहते हे या कथेत वाचायला मिळते. ब्रदर फिक्सेशन, दी रिअल हिरो आणि नंबर वन या तीनही कथा खूप वाचनीय आहेत. या कथासंग्रहाचा कळस शोभाव्यात अशा या तीन कथा आहेत. संपूर्ण कथासंग्रह वाचल्यानंतर खूप काही तरी नवे आणि वेगळे वाचल्याचा अनुभव मिळतो.
 देशमुखांच्या कथांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सूक्ष्म गोष्टींचे विस्तृत तपशील त्यांच्या कथांमध्ये आढळतात. ज्याला अभियंत्रिकीच्या भाषेत Major details of the minor things असे म्हटले जाते. त्यामुळे त्या त्या कथेसाठी आवश्यक असलेला परिसर ते मोठ्या ताकदीने उभा करतात. त्यामुळे त्या परिसराशी एकरूप





१२६ अन्वयार्थ