पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सुशिक्षित गृहिणी आहेत, स्वत: स्वतंत्र नोकरी करणाऱ्या आहेत. स्वत:चे मनस्वी भावपण जपता जपता विशेषत्वाने आधुनिक जीवनशैलीने, यंत्रसुलभतेने त्या दुःखार्द अनुभूतीच्या बळी ठरतात.
 पहिल्या 'माधुरी व मधुबाला' या कथेतील सरिता ही एका ममताळू नायकाची पत्नी आहे. मित्राच्या सल्ल्याने तो लिंगनिदानाची चाचणी करून घेतो. पण या घटनेवर पडदा म्हणून की काय पुढे सरिता रक्तस्रावामुळे अपुऱ्या दिवसाची बाळंत होते. तेव्हा बेबी कमी वजनाची जन्मल्यामुळे तिला इनक्युबेटरमध्ये ठेवावी लागली आहे. मला तिला एकदा पाहू द्या अशी म्हणते. हा तिचा भ्रम बळावतो तेव्हा बालसंकुलातील एक गोंडस मुलगी तिचा पती दत्तक घेऊन येतो. सरिता तिचा स्वीकार करते. हा सामाजिकतेचा धागा अतूट वाटतो. 'इमोशनल अत्याचार'मधील आशा या शिक्षिकेचे निर्भय रूप प्रकटले आहे. ती स्वत: नोकरी करून पहिल्या जुळ्या (आवळ्याजवळ्या) मुलींची घडण करते आहे. परंतु एकेकाळी पती असूनही प्रियकरासारखा वागणारा तिचा मिलिंद आपल्या कोकणातील गावी जाऊन आल्यापासून जुन्या रुढीप्रियतेमुळे बिथरला आहे व त्यालाही मुलगाच हवा आहे. त्यावेळी जुळ्या इशा-निशा यांच्या भावनांचा वापर केला जातो. दुसऱ्यांदा गर्भार आशावर भावनिक अत्याचार केले जातात. त्यातूनही ती धीर धरते. परंतु इशा स्वाईन प्लूने जेव्हा गंभीर आजारी पडते तेव्हा या परिस्थितीचा फायदा घेऊन तिचा गर्भपात घडवला जातो. त्यानंतर ती 'तो भ्रूण नवऱ्यासमक्ष दाखवा' म्हणते. हा आपण खूनच केलाय असे नवऱ्याला वाटते. नेमके त्याचवेळी डॉक्टर, 'गर्भपात करताना दिसून आलं की, तुमच्या मिसेसच्या फॅलोपाईन ट्यूब्स फार कमजोर झाल्या आहेत. तुम्हाला यापुढे कदाचित, कदाचित मूल होऊ शकणार नाही' (पृ. ३९) या घटनेने मिलिंद हतबुद्ध होतो. तो मुलींना सोनपऱ्या मानू लागतो. आणि रात्री बेडरूममध्ये जेव्हा येतो तेव्हा डबल बेडच्या जागी दोन सिंगल बेड पाहून प्रश्नांकित होतो. तेव्हा ती म्हणते, 'माझ्यातली पत्नी परवा रात्रीच गर्भपात करताना संपली. आता केवळ मी इशा-निशाची आई आहे.' (पृ. ४८). समस्त पुरुषी मानसिकतेला जोरदार चपराक बसावी असे हे विधान स्त्रीच्या बदलत्या बंडखोर मानसिकतेचे, प्रगल्भ विचाराचे, धडाडीचे निशाण आहे. हे महत्त्वाचे होय.

  तपशीलांच्या रूपाने वेगळ्या आवर्तनाचा वेध घेणारी ही कथा नेमक्या प्रवाहाचे सैद्धान्तिक रूप दर्शविते. 'पोलिटिकल हेअर' मधील सुप्रिया ही विद्यार्थिनी असणारी मुलगी आजच्या वर्तमानाचे तेजस रूप आहे. आत्मनिर्भर आहे. तिच्या वडिलांना आपला राजकीय वारसा जपण्यासाठी वारसदार म्हणून मुलगाच हवा असतो. त्यामुळे आपल्या मम्मी (आई) वरील अत्याचार ती पाहते आणि शेवटी

१०२ □ अन्वयार्थ