पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धाडसाने पप्पांना खडे बोल सुनावते - ही बदलती भूमिका खचितच उचित आहे. संग्रहातील 'लंगडा बाळकृष्ण' ही खरी अस्वस्थ करणारी, घटना-प्रसंगांचा व्यापक उच्चतम परिणामबिंदू साधणारी कथा होय. नियतीतत्त्वाचे काही कालअंश या कथेच्या अंतरंगात आढळतात. या कथेतील 'आई' सोज्वळ माता आहे. नवऱ्याच्या कर्तबगारीवर (?) खूश होऊन ती वावरते आहे. तिला कशाची ददात नाही. बाळंतपणानंतर ती नव्या घरात राहायला येते व त्याच दिवशी लहान बाळाला घेऊन नवऱ्यास आश्चर्यमुग्ध करावे म्हणून त्याच्या दवाखान्यात जाते. पण तिथे वेगळेच नियतीनाट्य घडते. नवऱ्याने ज्या स्त्री भ्रूणांची हत्या केल्यानंतर ते भ्रूण खाण्यासाठी दोन हॉऊंड जातीची कुत्री ठेवलेली होती ती कुत्रीच या निरापराध नवजात बाळास (डॉक्टरच्याच) धरतात. त्याच्या पायाचा लचकाच तोडतात. या प्रसंगाने सुखदा (नवऱ्याने ठेवलेले एकांतातील नाव) हादरून जाते. कानकोंडी होते. एका सुखासीन मातेचे विदीर्ण रूप या कथेत साधले आहे. 'जे परा ते येई घरा' याची प्रस्तावना ठरणारी ही कथा दुःखाचे, भयकारी रूपाचे दर्शन घडविते.
 'ऑपरेशन जिनोसाईड' सारख्या कथेत अंतर्विरोधी स्त्री मानसिकतेचे चित्रण आले आहे. यात गर्भपात करण्यासाठी आलेल्या स्त्रिया आहेत. तोळामासा प्रकृती असूनही गर्भधारणा सोसणाऱ्या नि संसारात ससेहोलपट झालेल्या स्त्रियांचे विश्व उभारले आहे. यामधील एका स्त्रीचा भ्रूण मुलाचा निघतो. ते समजताच ती स्त्री बेभान होते. मात्र दुसऱ्या क्षणी सारवासारव करून ती खूश राहते. ते माझी कूस स्त्रीलाच नाहीतर पुरुषालासुद्धा उपजवू शकते या आत्मगंडाने ती सुखावते. याच कथेत स्त्रीभ्रूणहत्येसाठी आपल्या नवऱ्यांना साहाय्य करणाऱ्या महिला डॉक्टर सुद्धा येतात. या घटनेचा निषेध म्हणून खबरीलालची बायको - नंदा ही त्या स्त्री डॉक्टरांचा मोर्चात खरपूस समाचार घेते नि भावनेच्या भरात, ‘त्या डॉक्टर निपुत्रिक राहतील - वांझ राहतील - वांझ' हा शाप जाहिररीत्या देते. हा मात्र स्त्रीत्वाचा अपमान वाटतो. तर दुसरी ज्योती मराठे ही तडफदार तहसीलदार स्त्रीसुद्धा या मोहिमेत सहभागी होते.

 या घटत्या मुलींच्या संख्येने भावी समाजावर कोणते आघात होतील, त्या भयावह परिस्थितीचे चित्रण या कथांमध्ये आले आहे. 'केस स्टडीज' मधील कांद्या-पोह्यांची सेंचुरी करणाऱ्या नीरास एकूण ९९ स्थळांनी नाकारले आहे. मात्र १०० व्या वेळी मात्र मनाविरुद्ध मुलगा असूनही ती त्याला पसंत करते व बापाला 'माझं त्या माणसाशी लग्न होत नाहीय तर माझ्यावर बलात्कार करायला तुम्ही लग्नाच्या नावावर परवानगी देताय' अस सुनावते. तर १९९१, २००१ आणि २०११ या जनगणणावर्षातील घटत्या बालिकादराचे चित्र अधोरेखित केले गेले

अन्वयार्थ □ १०३