पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथेचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे एखादी सामाजिक समस्या घेऊन त्याभोवती कथा गुंफणे. पण त्या कथांचा विषय हा गंभीर आणि एकूणच वाङ्मयव्यवहाराला महत्त्वाचा ठरावा असा असतो. आजवरच्या कथालेखनात त्यांनी पाणी टंचाईवर आधारलेल्या तहानले महाराष्ट्राच्या कथा (पाणी), खेळ व खेळाडूंच्या विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या कथा (नंबर वन) आणि स्त्रीभ्रूणहत्या या सामाजिक प्रश्नावरील (सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी) अशा एकेका सामाजिक प्रश्नांवर विविध कथा रेखाटल्या आहेत. या सर्व विषयसूत्रांना 'थीम बेस्ड कथा' हा शब्दप्रयोग योजलेला आहे. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा असाच एक स्त्रीभ्रूणहत्या हा विषय मांडणारा थीम बेस्ड कथासंग्रह आहे. संपूर्ण भारतीय परंपरेचा विचार केला असता कुटुंबव्यवस्थेमध्ये स्त्रीला हे दुय्यम स्थान दिलेले आढळते. त्यातही कुलदीपक (वंशाला दिवा) म्हणून 'मुलगाच हवा' हा अट्टाहास पोसला जातो. आणि त्याचे परिणामकारक रूप म्हणजे गर्भजल परीक्षा (चाचणी) घेऊन लिंगनिश्चिती केली जाते. आणि स्त्रीभ्रूण आढळून आले तर त्याची हत्या केली जाते. ही घटत्या बालिका दराची समस्या भविष्यातील मोठ्या अनर्थाची भयघंटा आहे. या प्रश्नामुळे व्यथित झाल्याने श्री. देशमुख यांनी एकाच विषयावर प्रथमपुरुषी निवेदनपद्धती तंत्रामधील वेगवेगळ्या आठ कथा लिहिल्या आहेत. या सामाजिक कुप्रथेला (मानसिकतेला) जाणीव जागृतीचा विचार दिला आहे. हे विचार फक्त कथेतून व्यक्त केले नाहीत तर स्वत: कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी (२००९) असताना 'कन्या वाचवा अभियान' राबवले व त्याचे पडसाद तत्काळ उमटले. एक समाजपरिवर्तनाचा / जागृतीचा विचार कृतीतून लेखनात उतरवला व या दाहक प्रश्नावर तोडगा शोधला. आणि त्याच विचारांचा आविष्कार म्हणजे या संग्रहातील या कथा होत.

 वास्तवतेचा मुक्त ललित दस्तऐवज या कथेतून साकारला आहे. या प्रत्येक कथेतील स्त्रीला एक स्वत:चा चेहरा आहे. स्वत:ची अस्मिता जागी झालेली ही स्त्रीरूपे होत. या एकूण पर्यावरणाचा विचार या कथेतील मुख्य संलग्न असा वस्तुनिर्देश आहे. 'माधुरी व मधुबाला' ते 'सावित्रीच्या गर्भात...' पर्यंतच्या आठ कथांमधील स्त्रीचित्रण हे विवेकजागृतीचे नवे रूप असल्याचा निर्वाळा देता येतो. एका समंजस विचारसंकरातून या स्त्रिया बोलत आहेत. त्यांची विरुद्ध बाजूही पुरुषी खलत्वाला मानदंड देणारी नाही तरी एका समंजसाचे, दर्शनाचे भान आहे. तिला तिचा असा तिच्या विचारांचा, अस्मितेचा अर्थ उमगला आहे. मात्र एवढे खरे असले तरी ती कोणा एका पुरुषी मानसिकतेचा अंकुश माथ्यावर वागवणारी आहे. त्यास बळी पडणारी आहे. तिच्या मनाविरुद्ध ती भ्रूणहत्येसाठी तयार होत आहे. यात विविध स्तरातील स्त्रिया समाविष्ट आहेत. त्या निरक्षर आहेत असेही नाही तर चांगल्या

अन्वयार्थ □ १०१