पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विवाह करता येत नसे. त्यामुळं अधिकृत संतती नसे. दोन, गुलामाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची संपत्ती सुलतानाच्या खजिन्यात जमा होई.
 ही रीत क्रूर होती. पण त्यातून कमीत कमी भ्रष्टाचार असणारी व वंशपरंपरेचा दबाव नसणारी प्रशासकीय पध्दती निर्माण करण्यात ओटोमान साम्राज्यानं यश मिळवलं. आजच्या काळात गुलाम ही संस्थाच नष्ट झाल्यानं ही पध्दती कालबाह्य झाली आहे.
 चिनी पध्दती मात्र मानवतावादी होती. प्रशासकीय कामकाजाच्या प्रशिक्षणासाठी स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून युवकांची निवड केली जात असे. अशी पध्दत सुरू करणारं चीन हे पहिलंच राज्य आहे. या परीक्षा चिनी साम्राज्याच्या सर्व प्रांतांच्या राजधान्यांमध्ये घेतल्या जात. पुढे ब्रिटिशांनी याच पध्दतीचं अनुकरण करून आयसीएस (इंडियन सिव्हिल सर्व्हिस) ची निर्मिती केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यालाच आयएएस (इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस) म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ही पध्दत जगभरात उपयोगात आणली जाते.
 सार्वजनिक प्रशाला (पब्लिक स्कूल) पध्दती भारतात ब्रिटिश व्यावसायिक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सुरू केली. कारखान्यांमधील प्रशासकीय व व्यवस्थापकीय जागांसाठी पात्र कर्मचारी निवडणे व त्यांना प्रशिक्षण देणं याकरिता ही केंद्रे सुरू करण्यात आली. यातील पदवीधरांनाही आयसीएस (इंडियन कोव्हेनेटेड सर्व्हिस) अशी संज्ञा होती. त्यांच्या शैक्षणिक दर्जाची तुलना सरकारी आयएएस पदवीशी केली जात असे.
उद्योग प्रशालांचा उदय :
 कुटुंब आणि नोकरीचे ठिकाण याखेरीज व्यवस्थापन प्रशिक्षण ही संकल्पना अमेरिकेत उद्योग प्रशालांच्या माध्यमातून उदयाला आली. या शाळांचा अभ्यासक्रम उद्योगक्षेत्रातील संचालक - अधिकाऱ्यांशी विचारविमर्श करून बनवला जात असे. हे अधिकारी अर्धवेळ शिक्षक म्हणून अशा शाळांमध्ये अध्यापनाचं कामही करीत असत. यामुळं विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांशी शिक्षण सुरु असतानाच संपर्क येत असे. याचा फायदा त्वरित नोकरी मिळविण्यासाठी होई. तसंच औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांप्रमाणं अभ्यासक्रमात बदल करणंही या शाळांना शक्य होई.

 सध्याचं युग झपाट्यानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचंं आहे. त्यामुळं व्यावसायिक किंवा व्यवस्थापकीय शिक्षण संस्थांनी त्याप्रमाणं आपल्या अभ्यासक्रमांत वेळोवेळी बदल करणं आवश्यक आहे. म्हणूनच त्यांनी सतत औद्योगिक संस्थेच्या संपर्कात राहणं निकडीचं आहे. त्याचप्रमाणं उद्योगांनाही शिक्षण क्षेत्रातील नवे प्रवाह जाणून घेण्यासाठी या संपर्काचा उपयोग होईल. त्यामुळं हा संपर्क व संवाद अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे.

व्यवस्थापकीय शिक्षणाचा प्रवास/२६९