पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘कर्मचारी' हा सभ्य शब्द रूढ झाला.
 पूर्वीच्या मालकांची जागा घेतलेल्या आजच्या 'उद्योगपती`पैकी कित्येकांची वर्तणूक पूर्वीच्या मालकांसारखीच आहे. ते उच्चशिक्षित आहेत, पण वृती सरंजामीच आहे. मालकाला अप्रिय पण उद्योगाच्या दृष्टीने हितकारक निर्णय घेणारे कर्मचारी, व्यवस्थापक त्यांना नकोसे वाटतात. याउलट स्वतःसमोर लाळघोटेपणा करणारे व आपली री ओढणारे 'कारभारी’ त्यांना हवे असतात. त्यांची कर्मचाच्यांशी वागणूकही सौहार्दपूर्ण नसते. कर्मचारी म्हणजे आज्ञापालन करणारं यंत्र अशा भावनेनं पाहिलं जातं. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, व्यवसाय वर्धिष्णू करावा अशी आच त्यांना नसते. ते उद्योगाच्या व्यवस्थापनात लक्ष घालतात, पण ते स्वतःच्या फायद्यासाठीच! धंद्याच्या विकासासाठी नव्हे. प्रामाणिक कर्मचारी वर्गही त्यांना भिऊन भिऊनच असतो. नव्या युगातील कर्मचारी किंवा नोकरही पारंपरिक मानसिकतेचे बळी आहेत. भारतात आजही कुटुंबाच्या मालकीचे (फॅमिली ओन्ड) उद्योगच जास्त आहेत. त्यातील अधिकारपदं सक्षम व्यक्तीच्या हातात असण्यापेक्षा त्या कुटुंबातील व्यक्तीच्या हातात (अकार्यक्षम असूनही केवळ मालक म्हणून) आहेत. म्हणून मी सुरुवातीला सांगितलेले प्रसंग आजच्या काळातही घडत असतात.
 या परंपरेचे फार मोठे दुष्परिणाम उद्योगक्षेत्राला भोगावे लागत आहेत. मालकांची सरंजामी वृत्ती, कारभाऱ्यांचा स्वार्थ व नोकरांचं भय यामुळे उत्पादकता घटत आहे. निर्णय घेणारा व तो अंमलात आणणारा यांच्यातील संपर्काच्या अभावामुळे अनुत्पादक खर्च वाढतो. उद्योगाचे भांडवल घटत जाते. चैनीच्या मागे लागून विजिगिषु व संशोधक वृत्ती संपल्याने नवं तंत्रज्ञान निर्माण होत नाही. त्यामुळे जगाच्या बाजारात आपल्या मालाची पत घसरते. अखेरीस परदेशी कंपन्या त्यांना ‘टेक ओव्हर' करतात.
 आता यावरील उपाय मुख्यत: मालकांच्या हातात आहे. त्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे तर व्यवसायाच्या विकासासाठी व्यवस्थापनात दखल घेतली, तर बऱ्याच समस्या सुटू शकतात. यामुळे कंपनीसाठी खऱ्या अर्थाने राबणाच्या कर्मचाऱ्यांशी त्यांचा संपर्क येऊ शकेल. कर्मचाऱ्यांच्या मनात असणारी मालकांबद्दलची भीती चेपेल. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वृध्दिंगत होईल. नव्या संकल्पना, युक्त्या, तंत्रे यांची देवाणघेवाण होईल. वस्तुस्थितीची जाणीव होईल व त्यातून प्रगतीचे मार्ग प्रकाशमान होतील. कारभाऱ्यांची भूमिका मर्यादित होईल. याखेरीज महत्त्वाच्या पदांवर माणसं

नेमताना नातेवाईकबाजीला फाटा दिला तर मार्ग आणखी सुकर बनेल.

मालकाबद्दल वाटणारी भीती/१२