पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आव्हान 'बदलां'चे

ळे तुला सांगते, तुझा जन्म जरी या घरातला असला नं, तरी हे घर तुझं नाही बरं! तुझ्या लग्नानंतर तू ज्या घरात जाशील ते तुझं खरं घर! पण तिथं इथल्यासारख हुंदडायला आणि वाटेल तेव्हा खायला प्यायला नाही मिळणार. सासरी तुला जबाबदारीन वागावं लागेल.तिथली सगळी माणसं तुला नवी असतील. त्यांच्याशी तुला हसतमुखानं जमवून घ्याव लागेल. नव्या घरचे रीतीरिवाज समजून घेऊन त्याप्रमाणं वागावं लागेल. सासुबाई,मामंजी, दीर,नणंद आणि हो तुझ्या 'ह्यां'ची मर्जी सांभाळावी लागेल. लग्नानंतर तुझ्या जीवनात बरेच बदल घडणार आहेत.’

 आणि बरं का, सासूबाई किंवा कुणी बोललं तरी भांडायचं नाही हं त्यांच्याबरोबर. एखादे वेळेस तुझ्याकडून चहात जास्त साखर पडली तर, सासूबाई म्हणतील तुझ्या बाबांनी साखरेची पोती नाही दिली हुंडा म्हणून! आणि कमी साखर घातलीस तर त्या म्हणतील,इतका नको चिक्कूपणा करायला, आमच्या घरात भरपूर साखर असते. अशा वेळी काय करायच माहिती आहे? मौनं सर्वार्थ साधनम् अगदी गप्प बसायचं.
 काही दिवसांनी तूर त्या घरात रुळशील.मग तुझा एखादा दीर किंवा नणंद अशा प्रसंगी तुझ्या बाजूने उभे राहतील.ती तुझ्या यशाची पहिली पायरी असेल आणि एक दिवस असा येईल की सासूबाई अखेरच्या घटका मोजत असताना आपल्या मुलीला नव्हे तर तुला जवळ बोलावतील आणि घराण्याचे दागिने तुझ्या स्वाधीन करतील.त्या दिवशी तू तुझ्या घराची मालकीण होशील.
 हा संवाद आहे माझ्याच घरातला. माझा जन्म एकत्र कुटुंबात झाला. त्याकाळी घरातल्या लग्नाच्या वयाच्या मुलींना पोक्त स्त्रिया असा उपदेश करीत.लग्नानंतर त्यांच्या जीवनात होणाच्या अचानक बदलाला' सामोरे जाण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी करीत.
नित्य बदल:

 आपल्या जीवनामध्ये कधीही न बदलणारी बाब कुठली असेल,तर ती म्हणजे बदल. जन्माला आल्यापासून प्रत्येक जण क्षणाक्षणाला नकळत बदलत असतो.

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची / १३