पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१८०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


त्याला आर्थिक विकास किंवा प्रगती यांच्याशी काही देणंघेणंं नसतं. किंबहुना संख्याबळ अधिक असणाच्या वर्गाचं हित पहाण्याच्या मिषानं विकास गतिमान करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये मोडता घालणं आणि स्वतःचंं नेतृत्त्व टिकवून धरणं याचीच त्याला आवड असते.सत्ताधाऱ्यांना‘अभिजन’ ठरवून त्यांचा पाणउतारा करणं आणि आपण बहुजन समाजाच्या हिताचे कैवारी असल्याचा आव आणणंं हे त्यांचं तत्त्व असतं. काही सन्माननीय अपवाद वगळता पुष्कळसे 'पुढारी’ असंच म्हणतात.अशा व्यक्ती ‘समाजातल्या'च असतात,पण समाजाच्या’ नसतात. या परिस्थितीमुळंं व्यवस्थापकांसमोर दुहेरी आव्हान उभं राहणार आहे.
 आर्थिक विकासाची फळंं तळागाळातील जनतेपर्यंत पोहचतील अशी धोरणंं या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी व्यवस्थापनाला आखावी लागतील. आर्थिक विकास फक्त अभिजनांसाठी नसून बहुजन समाजाकरिताही आहे याची खात्री पटल्यावर आर्थिक सुधारणा आणि जागतिकीकरण यांना बहुजन वर्गाचा पाठिंबा मिळू शकेल. यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न व्यवस्थापकांना करावे लागणार आहेत.
वांशिक संघर्षाचं आव्हान:
 तंत्रज्ञानाच्या विकासामुळं जग छोटं होत आहे.परिणामी जात,वर्ग,भाषा, राज्य,धर्म,राष्ट्र,इत्यादी भेदाभेदांचा प्रभाव पूर्वीइतका उरलेला नाही. तथापि, मानवाचे विचार,आदर्श आणि मानसिकता तंत्रज्ञानाइतक्या वेगाने बदलू शकत नाही. मानव स्वभावतःच इतिहासभिमानी असतो. त्यामुळं इतिहास काळात झेललेल्या जखमा आणि त्यांचे व्रण तो लवकर विसरू शकत नाही.त्यामुळं समाजाच्या विविध घटकांमधील ताणतणाव कायम राहतात. कधी कधी ते उग्र रूपही धारण करतात.
 आर्थिक विकासाच्या माध्यमातून समाजाला इतिहास विसरायला लावणं आणि भूतकाळ विसरुन भविष्यकाळावर लक्ष केंद्रित करण्याची मानसिकता निर्माण करणं हे आव्हानही तिसऱ्या सहस्त्रकातील व्यवस्थापकांना स्वीकारावं लागणार आहे.
 आव्हानं निश्चतच अवघड आहेत,पण अशक्य नाहीत.