पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१०८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळविण्याचा प्रकार कमी झाला.
 सध्याच्या खासगीकरण व जागतिकीकरणाच्या युगात स्पर्धा व तंत्रज्ञान विकास यामुळे साधनसंपत्तीची कमतरता कमी झाली आहे. त्यामुळे,वस्तूंची मुबलकता वाढली असून त्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 भ्रष्टाचाराची मुख्यत: तीन साधने आहेत. १) पैसा, २) शारीरिक संबंध, ३) भीती.
 बहुतेक भ्रष्टाचार पैशाच्या माध्यमातूनच होतो. कारण यात धोका कमी असल्याची भावना असते. काही वेळा लैंगिक वासनाकांडातून भ्रष्टाचार होतो. तर समाजकंटक व गुंड प्रवृत्तीचे लोक दहशतीच्या जोरावर आपल्याला हवी ती कामे करून घेतात.
भ्रष्टाचार आणि व्यक्ती :
 सर्व दोषांप्रमाणे भ्रष्टाचाराचं निवासस्थान माणसाचं मन हेच आहे. पैसा, भौतिक सुख यांचा अनावर मोह आणि भय त्याला यासाठी उद्युक्त करतात. भल्याभल्यांना या मोहाचं दडपण आवरत नाही. एखादी व्यक्ती किती भ्रष्टाचारी वा प्रामाणिक आहे हे तिच्या नैतिक पातळीवर तसंच संस्कारांवर ठरत असते.
 दोन पिढ्यांपूवीं माणूस 'सामाजिक प्राणी’ म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे स्वतःची अबू व प्रतिष्ठा यांना समाजाच्या भीतीने का असेना पण जपत होता. त्याचं व्यक्तिगत जीवन 'लोक काय म्हणतील' या सूत्रांवर बव्हंशी अवलंबून होतं. त्यामुळे भ्रष्टाचारावर काही प्रमाणात तरी स्वयंनियंत्रण होतं. आज माणूस ‘आर्थिक प्राणी' झाला आहे आणि ‘आर्थिक यश' सर्वात महत्वाचं मानलं जाऊ लागलं आहे. माणसाच्या कला, गुण इतकेच नही तर नैतिकतासुध्दा पैशाच्या परिमाणात मोजली जाऊ लागली आहे परिणामी, भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं आहे.
माणसाची द्विधा मनःस्थिती :
 प्रत्येक जण मनापासून भ्रष्टाचारी असतोच असं नाही, पण परिस्थिती काही वेळा त्याला मार्ग बदलण्यास भाग पाडते.

 यशाचे दोन त्रिकोण आहेत. एक पैसा, सत्ता व प्रतिष्ठा या बाजूंनी बनणारा तर दुसरा निर्मितीक्षमता, स्वातंत्र्य व प्रामाणिकता यांनी बनणारा. बहुतेकांनी या दोन्हींचा अनुभव घेतलेला असतो. पण कित्येकदा परिस्थितीमुळे माणसाला प्रामाणिकपणाची चौकट सोडून भ्रष्टाचाराकडे वळावं लागतं. प्रामाणिक माणूस भ्रष्टाचारी झाल्याची उदाहरणं असंख्य आहेत, पण भ्रष्टाचार्याला उपरती येऊन तो प्रामाणिक झाल्याची उदाहरणं हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या चौकटीची ताकद वाढत आहे. अशा स्थितीत अनेकांची मनःस्थिती द्विधा बनते.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/९९