पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नावाची एक आदर्श शाळा काढली होती. तिथे विद्यार्थ्यांवर काही बंधने नसत; युनिफॉर्म नाही, वर्ग नाही, परीक्षा नाही. मुलांनी शाळेत कधीही यावे आणि कधीही घरी जावे अशी पूर्ण मुभा होती. एरवी मुले शाळेत यायला नाखूष असतात आणि शाळा सुटल्याची घंटा झाली, की अगदी बागडत बागडत घरी जातात, असे एक सार्वत्रिक चित्र दिसते. पण तिथला अनुभव असा होता, की मुले शाळा सुरू व्हायच्या कितीतरी आधीच शाळेत यायची आणि शाळा सुटल्यानंतर घरी परतायचीही त्यांची तयारी नसे. त्यांच्या रात्रीच्या मुक्कामाची सोय मग टॉलस्टॉयना आपल्या इस्टेटीवरच्या जवळपासच्या खोल्यांमध्ये करावी लागे. शिंदे बोर्डिंगमधली मुलेही उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी लागली तरी घरी परतायला उत्सुक नसायची; इतकी ती बोर्डिंगमधल्या वातावरणात रमली होती. हे आकर्षण आणि ही भावनिक गुंतवणूक उभयपक्षी होती - मुलांमध्ये होती तशीच आस्थापना चालवणाऱ्यांमध्येही होती. "मुक्तद्वारमधल्या भावविश्वात मी पुरता गुंतून गेलो होतो," असे टॉलस्टॉय यांनी लिहिले आहे; बोर्डिंगमधल्या भावविश्वात रावसाहेबही तसेच गुंतून गेले होते. - बोर्डिंग चालू असतानाच एकीकडे रावसाहेबांचे शिक्षणही चालूच होते. इंग्रजी सहावीचे वर्ष संपले आणि जून १९४५ मध्ये त्यांनी इंग्रजी सातवीच्या, म्हणजेच मॅट्रिकच्या वर्षात प्रवेश घेतला. यापूर्वीच रावसाहेबांवर साम्यवादाचा प्रभाव पडायला सुरुवात झाली होती. त्यामागे मुख्य प्रेरणा अण्णाभाऊंची होती. रावसाहेबांमधल्या वैचारिक परिवर्तनाचा प्रभाव शिंदे बोर्डिंगवरही अपरिहार्यपणे पडतच होता; इतका, की शिंदे बोर्डिंगला पुढे पुढे लोक 'लाल बोर्डिंग' म्हणू लागले. कॉ. अमर शेख, त्यांचे कलापथक व इतरही कॉम्रेड्स त्या र असले हमखास इथेच मुक्काम करीत. बोर्डिंगच्या कामामुळे आणि आपल्या साम्यवादी चळवळीतील वाढत्या सहभागामुळे नाही म्हटले तरी रावसाहेबांचे शालेय अभ्यासाकडे दुर्लक्षच होत होते. तशातच संगमनेरमध्ये एकाएकी प्लेगची साथ उद्भवली. ही ऑगस्ट १९४५ मधली गोष्ट. रोगावर कुठलाच खात्रीचा असा इलाज उपलब्ध नव्हता. साहजिकच प्लेगला लोक प्रचंड घाबरत. त्यामुळे संगमनेरमध्ये एकच पळापळ सुरू झाली. गाव जवळजवळ ओसच पडले. पेटिट हायस्कूलही बंद केले गेले. बोर्डिंगमधली मुलेही आपापल्या गावी निघून गेली. सगळे कधी पूर्ववत सुरू होईल याची कुणालाच काही खात्री देता येत नव्हती. रावसाहेब तेव्हा मॅट्रिकला होते. त्यांचे ते महत्त्वाचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून अण्णाभाऊंनी त्यांची पुण्याला शिंदे बोर्डिंग... ९९