पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेड्यांच्या दुनियेत सापडलो आहोत असे वाटल्याशिवाय राहत नाही. वर्तमानपत्रे, रेडिओ, टीव्ही यांना तर या वेडाने पूर्ण झपाटले आहे. याला खेळ म्हणायचे का? तिकिटांचे उंची दर, खेळाडूंचा तो राजेशाही थाट, मोजक्याच खेळाडूंना होणारा मोजकाच व्यायाम हे सारे खऱ्या खेळाच्या दुनियेशी विसंगत आहे. ' }} अभ्यासाशिवाय बोर्डिंगमध्ये राजकारणाचीही चर्चा होई. तिचे स्वरूप एखाद्या अभ्यासमंडळाप्रमाणे गंभीर असे. पुस्तकांवर चर्चा होई; एकूणच वाचनाला उत्तेजन दिले जाई. अशा प्रकारचे प्रबोधन हे शिंदे बोर्डिंगचे इतर कुठल्याही बोर्डिंगपेक्षा वेगळे असे वैशिष्ट्य होते. मुलांमध्ये वक्तृत्वकला वाढीस लागावी म्हणून महिन्यातून एकदा वक्तृत्वस्पर्धा घेतली जाई. दर आठवड्याला बोर्डिंगच्या कामकाजासंबंधी बैठक व्हायची; व्यावहारिक बाबींचे विद्यार्थ्यांना भान यावे आणि व्यवस्थापनातही सर्वांचा सहभाग असावा म्हणून प्रयत्न केले जात. अन्यत्र सहसा कुठे होत नसे - - आणि आजही फारसा कुठे होत नसावा - असा एक खूप महत्त्वाचा उपक्रम बोर्डिंगमध्ये व्हायचा. तो म्हणजे आत्मपरीक्षणासाठी भरणारी मासिक बैठक. प्रत्येकाने स्वत:च्या जीवनाचे नीट निरीक्षण करायचे आणि आपण कुठे कमी पडत आहोत, वागण्या-बोलण्यात कुठे स्वार्थीपणा करतो, आपल्यात कायकाय दोष जाणवतात, आपण कुठेकुठे चुकतो हे सारे सर्व उपस्थितांना प्रांजळपणे सांगायचे. आरशात बघायचे, आपले रूप न्याहाळायचे, आपली कुरूपता स्वतःच हेरायची आणि इतरांना ती दाखवायची असा हा प्रकार होता. यात अधूनमधून गमतीचे अनुभवही सांगितले जात, विनोदी प्रसंगही येत; पण एकूण चर्चेला गंभीर परिशीलनाची खोली असे. ख्रिश्चन समाजात चर्चमध्ये एक छोटी खोली असते व तिच्यात जाऊन धर्मगुरूसमोर (फादरसमोर) आपल्या हातून घडलेल्या पापांची कबुली द्यायची असा एक रिवाज आहे. आपल्या हातून घडलेल्या पापांमुळे मनावर आलेले दडपण कमी व्हावे ही त्यामागची भूमिका. त्या छोट्या खोलीला 'कन्फेशन बॉक्स' असेच म्हटले जाते. पूर्वी कम्युनिस्टांच्या काही कम्यून्समध्येही अशा प्रकारची प्रथा होती. त्याच्याशी मिळताजुळता असाच हा शिंदे बोर्डिंगमधला उपक्रम होता. त्यातून सर्वांनाच एकमेकांची जवळून ओळख व्हायची, मुखवटे गळून पडायचे आणि परस्पर भावनिक नाते खूप दृढ व्हायचे. आपल्या समाजात अतिशय आगळावेगळा असा हा उपक्रम होता. रशियन लेखक व तत्त्वज्ञ लिओ टॉलस्टॉय यांनी १८५९ साली आपल्या आलिशान इस्टेटीमधल्या एका दालनात शेतकऱ्यांच्या मुलांसाठी 'मुक्तद्वार' अजुनी चालतोची वाट... ९८