पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुले कुऱ्हाडीचे सपासप घाव घालून रहदारीला अडथळा होईल अशा प्रकारे रस्त्यावर येणाऱ्या फांद्या तोडत आणि दोराने ओढत त्या फांद्या बोर्डिंगवर आणत. बोर्डिंगवर पोचल्यावर त्या फांद्यांचे लहानलहान तुकडे करून काही महिनेतरी पुरेल एवढा सरपणाचा साठा जमवत. एखादे क्रांतिकार्य करावे तशा गुप्तपणे ही सरपण- मोहीम पार पाडली जाई. हा सगळा प्रकार कायदेशीर नव्हता हे उघडच आहे, पण आपद्धर्म म्हणून हे करावेच लागे. रोज संध्याकाळी खेळण्यासाठी एक तास राखून ठेवलेला असे. ठाकोरांच्या मळ्यात खेळण्यासाठी ऐसपैस जागाही होती. आट्यापाट्या, खोखो, हुतुतू, शिवाशिवी हे मुलांचे आवडते खेळ होते. धर्मा पोखरकर व भाऊसाहेब थोरात शिंदे बोर्डिंगमध्ये राहत नव्हते; भाऊसाहेब जोर्व्याला आपल्या मूळ घरी व धर्मा संगमनेरजवळ म्हाळुगी नदीकाठच्या आपल्या आईवडलांच्या मळ्यात राहत व रोज जा- ये करून पेटिट हायस्कूलमध्ये शिकत. पण रोज संध्याकाळी ते दोघेही बोर्डिंगमध्ये खेळायला येत. शेतकरी बोर्डिंगमधले मित्रही यायचे. धर्मा ज्या बाजूने खेळणार, ती बाजू हुतुतू जिंकणार हे जणू ठरलेलेच असायचे; तो हमखास समोरच्या संघातील तीन-चार तरी खेळाडू बाद करायचा. शेतात भरपूर शारीरिक कामाची सवय असल्याने मुले खूप चपळ आणि काटक असायची. विशेष म्हणजे आजूबाजूचे शेतकरीही मुलांचे खेळ बघायला बोर्डिंगमध्ये जमायचे. 'शाब्बास, हुर्यो, अरे वा' असे ओरडत मुलांना उत्तेजन द्यायचे. हसतखेळत तास संपायचा आणि त्याची चर्चा नंतरही लोकांमध्ये खूप वेळ चालायची. या सर्व भारतीय खेळांमध्ये समयसूचकता, चापल्य, सावधपणा, एकाग्रता, लवचिकता, धाडस वगैरे गुणांना खूप वाव असायचा. मुलांमध्ये त्यांतून हे गुण बाणायचे, मोकळ्या निसर्गात वावर व्हायचा, आपसूक व्यायामही होऊन शरीर बळकट व्हाय व आनंदही भरपूर मिळायचा. बालपणी पाडळीमध्येही हेच बिनखर्ची खेळ रावसाहेब खेळायचे आणि इथे शिंदे बोर्डिंगमध्येही. या खेळांमुळे झालेले ते संस्कार त्यांच्या मन:पटलावरून आजही पुसले गेलेले नाहीत. म्हणूनच क्रिकेटसारख्या खेळावर त्यांचा खूप राग आहे. ते म्हणतात : "आज मुलेच नाही तर लहानमोठ्यांसह सारे तासन्तास अन् दिवसेंदिवस क्रिकेटसारख्या पैसेखाऊ, वेळखाऊ, ऐदीपणाचा असा खेळ पाहत गुंग होऊन जातात. ऑफिसातल्या लोकांचे कामाकडे लक्ष नसते; अडल्या नडलेल्यांना 'नंतर या' म्हणून वाटेला लावले जाते. विद्यार्थी लेक्चरला बसत नाहीत. प्राध्यापकांचेही लेक्चर घेण्याकडे किती लक्ष असते हा चर्चेचा विषय. हे सगळे दृश्य पाहून आपण कोणत्या शिंदे बोर्डिंग... ९७